Ajit Pawar's Political Legacy: राज्याच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी (बुधवार 28 जानेवारी 2026) विमान अपघातात निधन झाले. पुणे जिल्ह्यातील बारामती या त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात विमान उतरत असताना हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे केवळ पवार कुटुंबच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण हादरून गेले आहे.
अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर प्रशासनावरील आपली जरब आणि स्पष्टवक्तेपणामुळे ते राजकारणातील एक पॉवर हाऊस मानले जात होते. त्यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता त्यांच्या खुर्चीचा आणि राजकीय वारशाचा खरा उत्तराधिकारी कोण असेल, या चर्चांना उधाण आले आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death : महाजन ते पवार: राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे धक्कादायक मृत्यू, कसा बदलला महाराष्ट्र? )
अजित पवार यांचे कौटुंबिक आणि राजकीय समीकरण
अजित पवार यांचा जन्म आणि जडणघडण पवार कुटुंबाच्या राजकीय सावलीतच झाली. त्यांचे वडील अनंतराव पवार यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्यासोबत काम केले होते. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे थोरले बंधू होते.
अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार या सध्या हयात आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या एक सामाजिक कार्यकर्त्या असून सध्या त्या राज्यसभा खासदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पार्थ आणि जय हे दोन मुलगे आहेत. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार हे व्यवसायात सक्रिय आहेत, तर त्यांची बहीण विजया पाटील यांचे यापूर्वीच निधन झाले आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar Net Worth: अजित पवारांचे अपघाती निधन, किती श्रीमंत होते उपमुख्यमंत्री? पाहा संपत्तीचा सर्व तपशील )
सुनेत्रा पवार: वारसा जपण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार
अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या राजकीय वारशासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. सुनेत्रा पवार या केवळ अजित पवार यांच्या पत्नी नाहीत, तर त्यांचा स्वतःचा एक स्वतंत्र जनसंपर्क आहे. त्या सध्या राज्यसभा खासदार आहेत आणि बारामतीमधील स्थानिक राजकारणात त्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत.
बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या प्रमुख म्हणून त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. अजित पवार यांच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार हा एक सर्वमान्य चेहरा ठरू शकतो.
( नक्की वाचा : Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमानाचे सारथ्य करणाऱ्या कॅप्टन शांभवी पाठक होत्या तरी कोण? )
पार्थ पवार आणि जय पवार यांची भूमिका काय असेल?
अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार हे गेल्या काही काळापासून राजकारणात सक्रिय प्रयत्न करत आहेत. त्यांनी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना त्यात यश मिळाले नाही. पार्थ हे सातत्याने वडिलांच्या राजकीय कामात मदत करत आले आहेत.
दुसऱ्या बाजूला, धाकटे चिरंजीव जय पवार हे आतापर्यंत मुख्य प्रवाहातील राजकारणापेक्षा कौटुंबिक व्यवसायात अधिक लक्ष देत होते. मात्र, बारामतीमधील स्थानिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती लक्षणीय असते. जय पवार यांच्यामध्ये अनेक कार्यकर्ते अजित पवार यांची प्रतिमा पाहतात. त्यामुळे येणाऱ्या काळात पार्थ आणि जय यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवली जाते, यावर पवार कुटुंबाचे भविष्य अवलंबून असेल.
( नक्की वाचा : Ajit Pawar Plane Crash: 'क्रॅश' झालेलं राजकारण! संजय गांधी ते अजित पवार; भारतीय नेत्यांचे दुर्दैवी विमान अपघात )
पवार विरुद्ध पवार संघर्ष आणि बारामतीचे भवितव्य
अजित पवार यांच्या वारशाचा विचार करताना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
आता अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जनता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जाणार की सुनेत्रा पवार आणि त्यांच्या पुत्रांना सहानुभूती मिळणार, हा मोठा प्रश्न आहे. महायुतीमधील एक मोठा स्तंभ निखळल्यामुळे भाजपा आणि शिवसेना यांच्यासाठीही ही मोठी हानी आहे.
मराठा व्होट बँक आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण सांभाळण्यात अजित पवार यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पश्चात पक्षातील आमदारांची ताकद टिकवून ठेवणे, हे त्यांच्या वारसदारासमोरचे सर्वात मोठे आव्हान असेल.