
योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola Crime News : बीएएमएसच्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या एका 29 वर्षीय विद्यार्थिनीने साखरपुडा झाल्यानंतर होणारा पती आणि सासरकडील मंडळींकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून (BAMS girl Student died) आत्महत्या केल्याची खळबळजनक (Akola News) घटना 26 ऑगस्ट 2025 रोजी अकोला येथे घडली. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर 30 ऑगस्ट रोजी जुने शहर पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अकोल्याच्या मृत युवतीचे नाव कीर्ती मनोहर नगराळे (वय 29, रा. फरकाले नगर, अकोट) असे असून ती बीएएमएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. कीर्ती अकोल्यातील गीता नगर येथील लोटस ग्रीन अपार्टमेंटमध्ये एकटी राहत होती आणि देशमुख हॉस्पिटलमध्ये पार्टटाइम नोकरी करत होती.
साखरपुडा, मागण्या आणि तणावानंतर कीर्तीचा टोकाचा निर्णय..
20 जुलै 2025 रोजी कीर्तीचा साखरपुडा जालना येथील डॉ. आशिष गौतम वावळे यांच्याशी अकोट येथे पार पडला होता. काही दिवसांतच वराचे वडील गौतम वावळे यांनी लग्न जालना येथे करावे अशी अट घालत वधूपित्याकडे 8 लाख रुपयांची मागणी केली. मनोहर नगराळे यांनी ही मागणी पूर्ण केली, मात्र नंतर 20 ऑगस्टला पुन्हा 2 लाखांची मागणी करण्यात आली. या वाढत्या आर्थिक अपेक्षा आणि आशिषची दारू पिण्याची सवय यामुळे कीर्ती तणावात होती. तिची लग्न करण्याची इच्छाच मावळली होती, असे तिने वडिलांना सांगितले होते.
नक्की वाचा - Malegaon News: मदत मागायला गेली अन् वासनेची शिकार झाली! MIM नेत्याचे भयंकर कृत्य, अखेर...
आत्महत्येपूर्वी वाद, आणि शेवटचा दिवस
26 ऑगस्ट रोजी कीर्ती आणि आशिष यांच्यात फोनवरून वाद झाला. त्यानंतर कीर्ती काहीतरी चुकीचं पाऊल उचलू शकते, तिला तत्काळ घरी घेऊन या, असा फोन आशिषचे वडील गौतम वावळे यांनी कीर्तीच्या वडिलांना केला. ते रात्री 9 वाजता अकोल्यात पोहोचले असता, फ्लॅटमधील पंख्याला दोरी लावून कीर्तीने गळफास घेतल्याचे आढळून आले.

सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप
जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून कीर्तीच्या हस्ताक्षरातील सुसाईड नोट आणि तिचा मोबाइल जप्त केला. या चिठ्ठीत डॉ. आशिष वावळे, त्यांचे वडील गौतम वावळे आणि इतर सासरकडील मंडळी मानसिक छळाला कारणीभूत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
दरम्यान, या प्रकरणात कीर्तीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी डॉ. आशिष वावळे, गौतम वावळे आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे अकोला शहरात एकच खळबळ उडाली असून कोणतीही व्यक्ती मानसिक तणावातून जात असेल, तर तात्काळ मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जीवन अमूल्य आहे, आणि कोणत्याही समस्येवर मार्ग निघू शकतो, असं काही सामाजिक कार्यकर्त्यांच मत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world