योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोला शहरात पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच मित्राला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आणि त्यानंतर संशय दूर करण्यासाठी त्यालाच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची बाब उघड झाली आहे. मात्र उपचार सुरू असतानाच जखमी युवकाचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव करण्यात आला होता. त्यामुळे काही काळ हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचेच चित्र निर्माण झाले. मात्र पोलिसांना या घटनेबाबत संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि संपूर्ण प्रकरणाचा अवघ्या काही तासांत उलगडा केला.
अपघाताचा बनाव फसला; तपासात उघड झाला खुनाचा कट...
यादरम्यान, अकोल्याच्या डाबकी रोड परिसरातील रेल्वे गेटजवळ गंभीर जखमी अवस्थेत एका युवकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपींकडून हा अपघात असल्याचे सांगण्यात आले. मात्र मृतकाच्या शरीरावरील जखमांचे स्वरूप पाहून पोलिसांना संशय आला. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने घटनास्थळाची पाहणी करत तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान मृतकाच्या अंगावरील जखमा या अपघातामुळे नव्हे, तर मारहाणीमुळे झाल्याचं स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी चौकशीची दिशा बदलत पैशाच्या व्यवहारावर लक्ष केंद्रित केले. चौकशीत मित्रांमध्ये आर्थिक कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली.
तीन तासांत आरोपी गजाआड; पुढील तपास सुरू
मारहाणीनंतर संशय येऊ नये म्हणून आरोपीने जखमी मित्रालाच स्वतः शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आला. स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपास करत तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे अवघ्या तीन तासांत मुख्य आरोपी सुरेश अग्रवाल याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे अपघाताचा बनाव करून खुनाचे सत्य लपवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी होते का, मारहाणीचे नेमके कारण काय होते आणि आर्थिक व्यवहाराचे स्वरूप काय होते, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या जलद कारवाईमुळे अकोला पोलिसांनी आणखी एक गंभीर गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणला आहे.