योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोल्याच्या वाशिम बायपास रोडवरील सागर कॉलनी येथील प्रीती अरुण उपर्वट हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत कर सहाय्यक पदावर निवड मिळवली आहे. कठीण आणि स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत प्रीतीने मिळवलेलं यश अकोल्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. प्रीतीने अत्यंत जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर यश संपादन केलं आहे. एमपीएससीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थी मेहनत घेत असतात. मात्र त्यापैकी निवडक विद्यार्थ्यांनाच यश मिळते. अशा परिस्थितीत प्रीतीने कर सहाय्यक पदी निवड होऊन मिळवलेलं यश विशेष ठरत असून तिच्या मेहनतीची आणि अभ्यासू वृत्तीची सर्वत्र चर्चा होत आहे.
एकाच वेळी दोन परीक्षेत यश..
यादरम्यान, विशेष म्हणजे प्रीती उपर्वट हिने एकाच वेळी दोन स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या आणि दोन्ही परीक्षांमध्ये ती उत्तीर्ण झाली आहे. त्यापैकी कर सहाय्यक या पदासाठी तिची निवड झाल्याने तिच्या कर्तृत्वाची दखल घेतली जात आहे. स्पर्धा परीक्षांसाठी सातत्य, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. प्रीतीने अभ्यासाचे नियोजनबद्ध नियोजन करत आपले लक्ष्य निश्चित केले आणि त्याच दिशेने सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळेच तिला दुहेरी यश मिळवता आलं. तिच्या या यशामुळे अकोल्यातील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी नवीन प्रेरणा निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे.
कर सहाय्यक मंत्रालय वित्त विभाग मुंबई या ठिकाणी आता नियुक्ती होणार आहे.. तर दुसरी परीक्षा ही स्टेनो म्हणून सरळ सेवा भरती 2024 मध्ये या दोन्ही परीक्षा दिल्या होत्या आणि एकत्र दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होत नियुक्त पत्र आलं आहे मात्र आता ते कर सहायक म्हणून रुजू होणार आहेत.
कुटुंबीयांकडून आनंद आणि शुभेच्छांचा वर्षाव..
प्रीतीच्या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. तिची आई गृहिणी असून वडील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. तर भाऊ हा वकिलीचा अभ्यास करीत असून एका बहिणीचे लग्न झाले आहे. ती साध्या कुटुंबातून येत असूनही प्रीतीने कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळवले आहे. प्रीतीच्या या यशानंतर कुटुंबीय, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर अकोल्यात तिची मिरवणूकही जंगी काढण्यात आली. तसेच अनेकांनी तिच्या घरी भेट देत तिचे कौतुक केले. या दरम्यान, कठीण समजल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, मेहनत आणि सातत्य असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, हे प्रीती उपर्वट हिने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world