
योगेश शिरसाट, अकोला: लोकप्रतिनिधींना गावबंदी केली, तर सरकारला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावीच लागेल, अशा शब्दात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात गाजीपुर टाकळी येथे आयोजित क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सभेत ते बोलत होते.
सभेत बोलताना तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकत सरकारसमोर अनेक मागण्या ठेवल्या. अकोला जिल्ह्याला तात्काळ ओला दुष्काळग्रस्त घोषित करून प्रति हेक्टरी ५०,००० रुपयांची मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी, जुनी पिकविमा योजना लागू करावी, सोयाबीनला ८००० रुपये आणि कापसाला १२,००० रुपये हमीभाव मिळावा, थकीत पिकविमा रक्कम तात्काळ दिली जावी आणि स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्यात यावा, असं त्यांनी म्हटले.
इंग्रजांविरुद्ध लढणं सोपं होतं,सत्ताधारी आपल्यासारखे दिसतात!
सरकारवर टीका करताना तुपकर म्हणाले, “इंग्रजांविरुद्ध लढणं सोपं होतं कारण ते ओळखू येत होते, मात्र आजचे सत्ताधारी आपल्यासारखे दिसतात, त्यामुळे ही लढाई अधिक कठीण झाली आहे.” शेतकऱ्यांना जागृत होण्याचे आवाहन करत त्यांनी म्हटले, “तुमच्या घरात साप निघाला तर तुम्हीच त्याला मारता, त्याचप्रमाणे आपल्या हक्कासाठीही तुम्हालाच लढावं लागेल.”
शेतकरी मेल्यावरच प्रस्ताव पाठवणार का?”
तुपकरांनी राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, “शिर्डीतील कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी काल अतिवृष्टी नुकसानाचा प्रस्ताव पाठवण्याचे सांगितले होते. मात्र अतिवृष्टी आणि ढगफुटी होऊन पंधरा दिवस झाले तरी राज्य सरकारने तो प्रस्ताव पाठवलेला नाही. मग का? शेतकरी मेल्यावरच प्रस्ताव पाठवणार का?” दरम्यान, सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आणि त्यांनी तुपकर यांच्या मागण्यांना जोरदार पाठिंबा दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world