जाहिरात

Akola News : पतीला पाठीवर घेत रुग्णालयात धावाधाव; व्हायरल प्रकरणातील महिलेचा धक्कादायक खुलासा, रुग्णाला ICU...

व्हायरल प्रकरणानंतर प्रथमच माध्यमांसमोर आलेल्या माधुरी हरिजन यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

Akola News : पतीला पाठीवर घेत रुग्णालयात धावाधाव; व्हायरल प्रकरणातील महिलेचा धक्कादायक खुलासा, रुग्णाला ICU...

योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला 

Akola News : अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील एका व्हायरल व्हिडिओने राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ब्रेन स्ट्रोकग्रस्त पतीला उपचारासाठी रुग्णालयात आणल्यानंतर स्ट्रेचर उपलब्ध न झाल्याने पत्नी माधुरी हरिजन यांनी पती संजय हरिजन यांना थेट पाठीवर घेऊन रुग्णालय परिसरात फिरत उपचारासाठी धावपळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

महिलेचा गंभीर आरोप, त्या दिवशी नेमकं काय घडलं?

व्हायरल प्रकरणानंतर प्रथमच माध्यमांसमोर आलेल्या माधुरी हरिजन यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. रुग्णालयात दाखल करण्यासाठी पतीला आणल्यानंतर अनेकदा विनंती करूनही स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आलं नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मूर्तिजापूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना चार अपत्ये आहेत. दरम्यान, काही वर्षांपूर्वी झाडावरून पडल्यामुळे संजय हरिजन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर नागपूर येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा अकोल्यात उपचारासाठी आणण्यात आले होते. याच वेळी हा संपूर्ण प्रकार घडल्याचा दावा महिलेने केला आहे.

नक्की वाचा - Satara News : लेकाच्या पहिल्या वाढदिवसाला येण्याच्या तयारीत; देशासाठी लढताना आलं वीरमरण; साताऱ्यावर शोककळा

अखेर उपचार सुरू; मदतीसाठी पराग गवई सरसावले

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि राजकीय स्तरावर मोठी हालचाल झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर संबंधित दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांना मदतीचा हात दिला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर संजय हरिजन यांना अखेर अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. राज्यभर चर्चेत आलेल्या या प्रकरणामुळे शासकीय रुग्णालयांतील सुविधा, रुग्णसेवा आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com