Ambadas Danve Tweet On MLA Mahendra Dalvi: नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2025) सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून आजपासून खऱ्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपण्याआधीच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या ट्वीटने खळबळ उडाली आहे. अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा एक धक्कादायक व्हिडिओ ट्वीट केला आहे ज्यामध्ये ते पैशांच्या बंडलांसोबत दिसत आहेत.
काय आहे अंबादास दानवे यांचे ट्वीट?
"या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?" असा सवाल करत ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. व्हिडिओमध्ये शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 9, 2025
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?@mieknathshinde @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra #Moneypower #ruins #Maharashtra pic.twitter.com/WUDpmedTgo
या व्हायरल व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी हे पैशांच्या बंडलांसोबत दिसत आहेत. सोबतच या व्हिडिओमध्ये आणखी एक व्यक्ती दिसत आहे जो पैशांचे बंडल दाखवत आहे. ऐन हिवाळी अधिवेशनात अंबादास दानवेंनी टाकलेल्या या व्हिडिओ बॉम्बने खळबळ उडाली आहे. अधिवेशनात या मुद्द्यावरुन चांगलाच राडा होण्याचीही शक्यता आहे.
आमदार दळवींनी आरोप फेटाळले!
दरम्यान, "अंबादास दानवे यांनी याबाबतचे पुरावे सादर करावेत. तो लाल टीशर्टमधील व्यक्ती कोण आहे? त्याचा चेहरा दाखवावा. व्हिडिओमधील ती व्यक्ती मी नाहीच. कदाचित तो ठाकरेंच्याच पक्षातील नेता असेल. अधिवेशन सुरु असताना गोंधळ घालण्याचा हा प्रयत्न आहे. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी काय कारभार केला हे महाराष्ट्राने पाहिला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी असेन तर मी राजीनामा देईन.." असं आव्हान देत महेंद्र दळवी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world