
सरकारी अधिकारी आरटीआय कार्यकर्त्यांना हाताशी धरून बिल्डरांना ब्लॅकमेल करत असल्याचा गंभीर आरोप बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशनने केला आहे. या आरोपांमुळे दोन्ही शहरातील शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सरकारी अधिकारी बिल्डरांना दोन-दोन तास ऑफिसबाहेर बसवून ठेवतात, बिल्डरांना भेटण्यासाठी त्यांना वेळ नसतो. पण माहिती अधिकार कार्यकर्ते याच अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये चार-चार तास बसलेले असतात. अंबरनाथ, बदलापूर, तहसीलदार, प्रांत किंवा अगदी कलेक्टर ऑफिसलाही हीच परिस्थिती असते, असा आरोप बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशनचे सचिव ज्ञानधर मिश्रा यांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इतकंच नव्हे, तर अधिकारी लोकच बिल्डरांची माहिती या माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडे लिक करतात, यातून संगनमताने बिल्डरांना ब्लॅकमेल केलं जातं, असा खळबळजनक आरोप मिश्रा यांनी केलाय. अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील बिल्डरांना आरटीआय कार्यकर्त्यांचा त्रास वाढला असून यामागे अधिकारीच असल्याचंही बिल्डर असोसिएशनचे सचिव ज्ञानधर मिश्रा म्हणाले. त्यांच्या या आरोपांमुळे अधिकारी वर्गाचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत.
दुसरीकडे, अंबरनाथच्या चिखलोली धरणालगत शासकीय जागेत रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा दावा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केला आहे. ही रिसॉर्टची जागा शासनाच्या नावावर झाली असून त्यामुळे रिसॉर्टवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी अंबरनाथ पालिकेकडे केली आहे.
( नक्की वाचा : Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, महाकुंभात केले पिंडदान, Video )
अंबरनाथच्या चिखलोली परिसरात लघुपाटबंधारे विभागाचं चिखलोली धरण आहे असून धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जातो. या धरणालगतच्या भूखंडावर काही वर्षांपूर्वी विकासक विक्रमराज उर्फ गुड्डू चौहान यांच्या रिसॉर्टचं बांधकाम करण्यात आलं होतं. मात्र चिखलोली धरणाची उंची वाढवल्यानंतर रिसॉर्टची जागा सुद्धा चिखलोली धरणाच्या नावावर करण्यात आल्याचा दावा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केला असून याबाबतचा सातबारा उतारा देखील त्यांनी दाखवला आहे.
त्यामुळे भविष्यात ही जागा शासनाच्या नावावर होणार, हे माहीत असूनही रिसॉर्टला बांधकाम परवानगी देणाऱ्या अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसंच आता शासकीय जागेवर असलेल्या या अनधिकृत रिसॉर्टची बांधकाम परवानगी रद्द करून तोडक कारवाई करावी, अशी मागणी शिर्के यांनी अंबरनाथ नगरपालिकेकडे केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world