शुभम बायसकार, अमरावती
Amravati News: अमरावतीमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काँग्रेसने 101 फुटांची भव्य गुढी उभारून जोरदार शक्तिप्रदर्शन केले खरे, मात्र या सोहळ्यात राजकीय चर्चेचा विषय ठरली ती पक्षांतर्गत गटबाजी. अमरावतीच्या राजकमल चौकात आयोजित या कार्यक्रमात काँग्रेसच्या अधिकृत फलकावरून स्थानिक खासदार बळवंत वानखडे यांचा फोटोच गायब असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून सरकारचा निषेध करणाऱ्या काँग्रेसच्या स्वतःच्याच घरात आता वादाचे 'सिलेंडर' पेटल्याचे पाहायला मिळत आहे.
गुढी आकाशाला भिडली पण खासदाराचा फोटो गायब
अमरावती शहर काँग्रेस कमिटी आणि नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने हा गुढीपाडवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या मुख्य फलकावर "उष:काल होता होता काळरात्र झाली..." या गाण्याच्या ओळी मोठ्या अक्षरात लिहिल्या होत्या.
जनतेला उमेदीचा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला, पण ज्या पक्षाने हा संदेश दिला, त्याच पक्षाच्या खासदाराचा फोटो फलकावर कुठेच नव्हता. स्वतःच्याच खासदाराला अशा प्रकारे 'अंधारात' ठेवल्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
( नक्की वाचा : Shirdi News: कॅप्टन खरात प्रकरणात विखे पाटलांचा खळबळजनक खुलासा, अहिल्यानगर जिल्ह्यात अनेकांना फुटला घाम! )
माजी मंत्र्यांची उपस्थिती आणि भव्य रॅली
या कार्यक्रमात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते विधिवत गुढीपूजन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या वतीने शहरात मोठी दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या प्रसंगी माजी मंत्री सुनील देशमुख, बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि नगरसेवक उपस्थित होते. नेत्यांची मांदियाळी असतानाही खासदारांच्या फोटोची अनुपस्थिती सर्वांच्या नजरेत भरत होती.
खासदार वानखडे यांचे सूचक उत्तर
पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात स्थानिक खासदाराचा फोटो असणे हा एक प्रोटोकॉल असतो. या प्रकरणावर खासदार बळवंत वानखडे यांनी दिलेली प्रतिक्रिया अधिक बोलकी ठरली. "मी दिल्लीला होतो, त्यामुळे माझ्या फोटोचा बॅनरशी संबंध नाही," असे सांगून त्यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेते दिल्लीत असले तरी त्यांचे फोटो फलकावर असणे ही राजकीय पद्धत आहे, त्यामुळे हे उत्तर राजकीय जाणकारांच्या पचनी पडलेले नाही.
( नक्की वाचा : गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा 'गुगली'! शरद पवारांची जोरदार प्रशंसा; बारामतीचं नाव घेत दिलं मोठं आव्हान )
काँग्रेसमधील 'सिलेंडर' कोण?
सध्या आखाती देशातील युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने "सिलेंडर झाला आडवा, कसा करू गुढीपाडवा?" असे फलक लावून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मात्र, ज्या पक्षात खासदाराचा फोटोच 'आडवा' पडला आहे, तिथे खरा 'आडवा सिलेंडर' नेमका कोण? असा खोचक प्रश्न आता अमरावतीत विचारला जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना काँग्रेसला स्वतःच्या घरातील 'काळरात्र' लपवता आली नसल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world