Amravati News : सत्यम गांधींची 'सिंघम' स्टाइल कारवाई; महिलांचे हाल पाहून थेट आदेश, अधिकाऱ्यांनाही अल्टिमेटम

५ दिवसात समस्या सुटल्या नाही तर थेट निलंबनाची कारवाई होणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारींनी सांगितलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, प्रतिनिधी 

Amravati News : उन्हाळ्याच्या कडाक्यात मेळघाटातील अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. ती निवारण्यासाठी आणि स्पॉटवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी थेट मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. गांधी यांनी मेळघाटातील अनेक गावांचा मॅरेथॉन दौरा करत इतरही समस्या जाणून घेतल्या.

महिला विहिरीतून पाणी काढत असल्याचं पाहून सीईओंचा संताप....

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी स्वतः शनिवारी (२ मे) पहाटे ते रात्री उशिरापर्यंत चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील दुर्गम गावांचा दौरा करत पाणीटंचाईची भीषण वास्तवता प्रत्यक्ष अनुभवली. तारूबांदा येथे महिला विहिरीतून हाताने पाणी काढत डोक्यावरून वाहून नेत असल्याचं दृश्य पाहून CEO संतापले आणि तातडीच्या उपाययोजनांचे आदेश देत त्यांनी निष्काळजी अधिकाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उचलण्याचे स्पष्ट संकेत दिले.

Advertisement

तारूबांदा येथे पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प असल्याने ग्रामस्थांना विहिरीतून हाताने पाणी काढून डोक्यावर वाहून न्यावे लागत आहे. हे दृश्य पाहताच CEO सत्यम गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तत्काळ विहिरीवर जाळी बसवणे, १५व्या वित्त आयोगातून मोटर आणि स्टँडपोस्ट उभारणे, टेंडर प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले. सोलर पंप बसेपर्यंत तात्पुरती व्यवस्था उभारण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

नक्की वाचा - Yavatmal News : 6 वर्षांच्या अन्वीचा बळी कुणामुळे? महाराष्ट्रातील आणखी एक धक्कादायक घटना

५ दिवसात समस्या सुटल्या नाही तर थेट निलंबन

धारणी तालुक्यातील कढाव येथे ग्रामस्थांनी थेट सीईओ सत्यम गांधी यांच्याकडे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या. पुढील पाच दिवसांत समस्या निकाली निघाली नाही तर संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. गट विकास अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारी पंचायत यांना तत्काळ गावात पाठवण्याचे आदेशही त्यांनी दिले. या मॅरेथॉन दौऱ्यात कोहाना, बिहाली, माखला, टेमभूरढाणा, भिलोजा, राक्षा, आढाव, ढाकणा, सावऱ्या, बोरिखेडा अशा एकापाठोपाठ एक गावांना भेटी देण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी थेट प्रश्न विचारत त्रुटींवर जागीच उपाय सांगण्याची सीईओ यांची पद्धत अधिकाऱ्यांना नक्कीच जड गेली असावी. माखला येथील आरोग्य उपकेंद्रात इन्व्हर्टर चार्ज होत नसल्याचं दिसताच तत्काळ बॅटरी बदलण्याचे, अंगणवाडीतील बंद डिजिटल टीव्ही दुरुस्त करण्याचे आदेश मिनिटांत दिले गेले. आढाव येथे सीईओ सत्यम गांधी यांनी स्वतः टॅब उघडून पाणीपुरवठ्याची खात्री केली. एक दिवसाआड पाणी मिळत असल्याचे समोर येताच दररोज सकाळी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.