जाहिरात

Yavatmal News : 6 वर्षांच्या अन्वीचा बळी कुणामुळे? महाराष्ट्रातील आणखी एक धक्कादायक घटना

रोजच्या जगण्याचा प्रश्न असलेल्या पारधी समाजाला पाण्यासाठी सुद्धा भटकंती करावी लागत आहे.

Yavatmal News : 6 वर्षांच्या अन्वीचा बळी कुणामुळे? महाराष्ट्रातील आणखी एक धक्कादायक घटना

संजय तिवारी, प्रतिनिधी 

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती पारधी बेडा गावात एका 6 वर्षीय चिमुकलीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या गावात पाण्यासाठी भीषण परिस्थिती आहे. या चिमुकलीला पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करत जावं लागत होतं, त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा उष्माघाताचा बळी की पाणी टंचाईचा असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पाण्यासाठी नागरिकांची पायपीट...

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती पारधी बेडा या गावात 56 कुटुंब राहतात. साधारण 350 लोकसंख्या असलेलं हे छोटे गाव. येथे अधिकांश फासेपारधी समाजाचे कुटुंब राहतात. गावातील प्रत्येक घरासमोर नळ कनेक्शन दिसून येतं. मात्र या नळाला पाणी येत नाही. आठ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने इतर दिवस गावकऱ्यांना पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. सहा वर्षांची अन्वी अनाडी भोसले दुपारच्या सुमारास डोक्यावर कळशी घेऊन पाण्यासाठी गेली होती. मात्र त्यानंतर ती परत घरी आलीच नाही.

अन्वी हिला कुठलाही आजार नव्हता. पाणी आणण्यासाठी गेल्यावर तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली यातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शोध घेतला जात आहे. मात्र, मुळात अन्वी हिचे शवविच्छेदन होऊ न शकल्याने तिच्या मृत्यूचं कारण कसं शोधायचं, याचा मोठा प्रश्न आरोग्य यंत्रणेपुढे उभा आहे.

नक्की वाचा - Pune News : उकाडा असह्य झाला, तिघे तरुण घराबाहेर पडले अन्...; पुण्यातील 3 कुटुंबांवर मोठा आघात

दारासमोर नळ तरीही पाणी का नाही?

अजंती पारधी बेडा गावात पाण्यासाठीचे नळ तर पोहोचले आहेत, मात्र या नळाला पाणी नाही. हे नळ पाण्याच्या टाकीपासून अगदी काही अंतरावर आहेत. तरीही पाण्याची सोय नाही. 8 दिवसांआड या नळातून पाणी पुरवठा होतो. त्यामुळे रोजच्या जगण्याचा प्रश्न असलेल्या पारधी समाजाला पाण्यासाठी सुद्धा भटकंती करावी लागत आहे. एका चिमुकलीच्या मृत्यूनंतर तालुक्यातील प्रशासन खळबळून जागं झाले आहे. मात्र आधीच पाणी पुरवठा सुरळीत झाला असता तर एका चिमुकलीचा जीव वाचला असता अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com