शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati News : अमरावतीतील एमपीएससी पूर्व परीक्षेदरम्यान दिव्यांग उमेदवारांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत परीक्षा द्यावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. विविध आस्थापनांमध्ये दिव्यांगाचा विचार करून ये-जा करण्याची रचना केली जावी अशी किमान अपेक्षा असते.
तळमजल्यावर आसनव्यवस्थेची मागणी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष...
रॅम्प, व्हीलचेअर किंवा पर्यायी प्रवेशमार्गाची कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेक दिव्यांग परीक्षार्थ्यांना तब्बल ३८ पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्ष गाठावं लागत होतं. एका उमेदवाराला तर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी उचलून वर्गखोलीपर्यंत नेल्याची घटना घडली. यापूर्वी तळमजल्यावर आसनव्यवस्थेची मागणी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. या प्रकारामुळे दिव्यांगांसाठीच्या सुविधा आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.