शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati News : 650 किलोमीटरसाठी हेलिकॉप्टर....पोलिसांचा कडक बंदोबस्त...१५ वाहनांचा ताफा...सुरक्षेसाठी CISF चे जवान...महसूल विभाग अन् भारतीय डाक सेवेचे कर्मचारी-अधिकारी तैनात...सध्या अमरावती जिल्हा कोषागार भवनाला अक्षरश: छावणीचं स्वरुप आलेलं आहे. हा इतफा मोठा बंदोबस्त पंतप्रधान किंवा कोणत्याही VVIP साठी करण्यात आल्याचं तुम्हाला वाटत असेल, मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. हा मोठा बंदोबस्त नीट परीक्षेच्या पेपरसाठी करण्यात आला आहे.
२१ जूनला नीटच्या परीक्षेसाठी सरकारची जोरदार तयारी...
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी NEET या प्रवेश परीक्षेत पेपरफुटीमुळे देशभरात मोठा गदारोळ झाला होता. अनेकांनी या ताणातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही संताप व्यक्त केला आहे. ठिकठिकाणी आंदोलनं पुकारण्यात आलं. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. परिणामी पुढील परीक्षा घेताना सरकारकडून अधिक काळजी घेतली जात आहे. २१ जूनला नीटची पुनर्परीक्षा होणार आहे.
अमरावती जिल्हा कोषागार भवनाला छावणीचं स्वरुप...
नीट परीक्षेच्या पेपरफुटीनंतर आता मोठी खबरदारी घेतली जात आहे. अमरावतीमध्ये नीट परीक्षेसाठीचे पेपर चक्क हेलिकॉप्टरमधून आणण्यात आले. मुंबईवरुन गाडीमध्ये नाही तर हेलिकॉप्टरमधून हे पेपर अमरावतीमध्ये पोहोचवण्यात आले. प्रचंड पोलीस बंदोबस्तात आणि 15 वाहनांच्या ताफ्यात हे पेपर अमरावती जिल्हा कोषागार भवनात ठेवण्यात आले. पेपरच्या सुरक्षेसाठी CISF चे जवानही तैनात करण्यात आले आहेत. नीटचा पेपर फुटल्याने ही परीक्षा पुन्हा एकदा 21 जूनला होणार आहे. पुन्हा कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जातेय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world