शुभम बायस्कार, अमरावती:
Amravati Politics News: अमरावतीच्या बडनेरा येथील ६७ कोटी रुपयांच्या भव्य चार लेन रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ माजला आहे. रविवार रोजी होणाऱ्या या बहुप्रतिक्षित कार्यक्रमापूर्वीच श्रेयवादाची लढाई अत्यंत टोकाला पोहोचली असून, थेट खासदार विरुद्ध आमदार असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. आमदार रवी राणा यांनी प्रसिद्ध केलेल्या एका स्वतंत्र निमंत्रण पत्रिकेनंतर हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
बडनेरा उड्डाणपुलावरून हायव्होल्टेज ड्रामा
मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांचे नाव स्पष्टपणे समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, आमदार रवी राणा यांच्या वतीने सोशल मीडियावर आणि मतदारसंघात फिरत असलेल्या स्वतंत्र निमंत्रण पत्रिकेतून खासदार बळवंत वानखडे यांचे नावच वगळण्यात आल्याचे दिसत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या पत्रिकेतून महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आणि ज्येष्ठ नेते प्रवीण पोटे-पाटील यांचे नावही गायब करण्यात आले आहे. या पत्रिकेत केवळ स्थानिक नगरसेवकांची नावे ठळकपणे छापण्यात आल्यामुळे हा आमदार रवी राणा यांचा 'वन मॅन शो' असल्याची चर्चा रंगली आहे.
शासकीय निधीतून आणि रेल्वेच्या माध्यमातून झालेल्या या मोठ्या विकासकामाचे श्रेय घेण्यासाठी वरिष्ठ लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची टीका आता विरोधकांकडून केली जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, कोणत्याही अधिकृत किंवा शासकीय कार्यक्रमातून जिल्ह्याच्या खासदारांचे नाव गाळणे हे संसदीय परंपरेला आणि राजकीय शिष्टाचाराला धरून नाही.
या पत्रिकेमुळे रवी राणा हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी विकासकामांनाही राजकीय रंग देत आहेत का? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, रविवारी होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असताना, त्यापूर्वीच पेटलेल्या या श्रेयवादाच्या राजकारणामुळे बडनेरा आणि अमरावतीमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
MSRTC News: मुंबई-पुणे रेल्वे ठप्प! गैरसोय टाळण्यासाठी STचा मोठा निर्णय; प्रवास होणार सुपरफास्ट