MSRTC News: मुंबईसह पुण्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला. या जोरदार पावसाने लोणावळा, खंडाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. यामुळेच मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर विस्कळीत झाला असून कामासाठी तब्बल ३० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एसटीचा दिलासा
सविस्तर वृत्त असे की, मुंबई–पुणे मार्गावरील दररोज धावणाऱ्या सुमारे ३० रेल्वे गाड्या रद्द असल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तातडीने अतिरिक्त बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून या मार्गावर दररोज २०० अतिरिक्त बसफेऱ्या चालविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
या विशेष नियोजनाअंतर्गत ई-शिवनेरीच्या ३१२ नियोजित फेऱ्यांसह साध्या बसेसच्या २०० जादा फेऱ्या मुंबई–पुणे मार्गावर दररोज चालविण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड पर्यायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय, प्रवाशांची प्रत्यक्ष गर्दी लक्षात घेऊन संबंधित आगार आणि विभागांना आवश्यकतेनुसार आणखी जादा बसेस सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रवाशाला वाहतुकीअभावी अडचण येऊ नये, यासाठी एसटी प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “संकटाच्या प्रत्येक काळात एसटीने जनतेचा विश्वास सार्थ ठरविला आहे. रेल्वे सेवा बाधित झाल्यानंतरही प्रवाशांचा प्रवास सुरळीत राहावा, यासाठी एसटी महामंडळ पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. प्रवाशांची सुरक्षितता, सोय आणि वेळेवर सेवा हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, गरजेनुसार आणखी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येईल.”
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world