शुभम बायस्कार, अमरावती: प्रहार पक्षाचे प्रमुख तथा अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांना सहकार विभागाने नोटीस बजावत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून आपल्याला निलंबित का करू नये, असे खडेबोल सुनावले असतानाच बच्चू कडूंचा पाय आणखी खोलात जाण्याची स्थिती आहे. कारण आता त्यांच्याच गटातील पाच संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बच्चू कडू यांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष असलेल्या अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांच्या गटातील तीन संचालकांना फोडत दोन वर्षापूर्वी बँकेवर सत्ता स्थापन केली होती. तेव्हापासून बच्चू कडूवर चाल करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत. आता विरोधी गटातील संचालकांच्या हाती बच्चू कडूंचे एक जून प्रकरण लागलेलं आहे. ते म्हणजे 2017 मध्ये नाशिक मधील सुकरवाडा पोलीस स्टेशन येथे शासकीय कामात अडथळा व मारहाण करण्यासंदर्भात बच्चू कडू यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणात त्यांना नाशिकच्या विशेष न्यायालयाने एक वर्षाचे कठोर कारावासाची शिक्षा 2021 मध्ये सुनावली आहे. हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ठ आहे. बँकेच्या उपविधीप्रमाणे बँकेच्या संचालकाला न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली असेल तर त्याला बँकेच्या कोणत्याही पदावर राहता येत नाही, असे प्रावधान आहे. नेमके हेच प्रकरण बच्चू कडूना सध्या अडचणीचे ठरले आहे.
Vasai News: समुद्रावर मौजमजा करायला गेले अन् अडचणीत सापडले, दीड तासाच्या थरारानंतर 'असा' वाचला जीव
यावरूनच विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रवीण फडणीस यांनी बच्चू कडूना 7 फेब्रुवारी रोजी नोटीस बजावत 26 फेब्रुवारीपर्यंत बाजू मांडण्याबाबत ताकीद दिली आहे. असं असतानाच दुसरीकडे बच्चू कडू यांच्या गटात सहभागी असलेले संचालक नरेशचंद्र पंजाबराव ठाकरे, जयप्रकाश दयाराम पटेल, आनंद नंदकुमार काळे, अजय शंकर मेहकरे, चित्रा प्रशांत डहाणे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार लटकलेली आहे.
त्यांनी बँकेच्या हिताविरुद्ध कामकाज केल्याने विरोधी गटातील 12 संचालकांनी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सहकार विभागाने बच्चू कडू गटातील पाच संचालकांवर अविश्वास आणण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 14 फेब्रुवारीला सभा बोलविण्यात आली आहे. विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांची या सभेकरिता पिठासीन सभापती म्हणून निवड केली आहे.
14 फेब्रुवारी रोजी बच्चू कडू गटातील पाच संचालकांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा प्रस्ताव विरोधकांकडून मांडला जाणार आहे. या प्रस्तावावर सुरेश साबळे, सुनील वराडे, हरिभाऊ मोहोड, वीरेंद्र जगताप, श्रीकांत गावंडे, सुधाकर भारसाकळे, दयाराम काळे, अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख, पुरुषोत्तम उर्फ बाळासाहेब अलोने, सुरेखा सुरेंद्र ठाकरे, मोनिका संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, रवींद्र गायगोले आदी विरोधी गटातील संचालकांच्या स्वाक्षरी आहेत. याच सभेत विरोधकांना बच्चू कडूंची बँकेतील सत्ता उलथवण्यात यश येते का, याकडे सहकार क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत.