
राज्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना 73 कोटी 91 लाख 43 हजाराच्या मदतीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आले असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले, नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यास शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. शासनाने बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करुन मदत देण्याच्या घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळेल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.
ही मदत देण्यास मान्यता देण्यात आलेल्या कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जून 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना 37 लाख 40 हजार रुपये तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत शेत पिकांच्या नुकसानीपोटी 73 कोटी 54 लाख 3 हजार मदतीचा समावेश असल्याचे पाटील यांनी सांगितले.अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी रायगड जिल्ह्यातील 980 बाधित शेतकऱ्यांच्या 55.65 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 11 लाख 81 हजार रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 560 शेतकऱ्यांच्या 71.54 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 12 लाख 96 हजार रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 335 शेतकऱ्यांच्या 50.64 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 12 लाख 63 हजार रुपये असे 1 हजार 875 शेतकऱ्यांच्या 177.83 हेक्टरवरील बाधित झालेल्या पिकांसाठी मदत म्हणून 37 लाख 40 हजार रुपये इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त नागपूर यांनी पाठवल्या 21 जुलै 2025 च्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यात जून मध्ये 1 बाधित शेतकऱ्याच्या 0.40 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 9 हजार रुपये तर जुलै 2025 मधील नुकसानीच्या मदतीसाठी 18 ऑगस्ट 2025 रोजी पाठविलेल्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यातील 7 हजार 450 शेतकऱ्यांच्या 4559.62 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 392.83 लाख रुपये. वर्धा जिल्ह्यातील 821 शेतकऱ्यांच्या 485.80 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 41.54 लाख, तर जुलै 2025 मधील नुकसानीच्या मदतीसाठी 2 हजार 827 शेतकऱ्यांच्या 2224.91 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 189.2 लाख, चंद्रपूर जिल्ह्यात जून व जुलै 2025 मधील नुकसानीच्या मदतीसाठी 13 हजार 742 शेतकऱ्यांच्या 8621.06 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 733.00 लाखाच्या मदतीचा समावेश आहे.
विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यात जुलै 2025 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार 396 शेतकऱ्यांच्या 215 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 18.28 लाखाच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यात जुलै 2025 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार 59 हजार 110 शेतकऱ्यांच्या 56 हजार 961.73 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 5979.17 लाखाच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world