संकेत कुलकर्णी, पुंढरपूर
लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी सोहळ्याची अभूतपूर्व तयारी पूर्ण झाली आहे. या मंगल प्रसंगी विठुरायाच्या मूर्तीवर परिधान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अत्यंत आकर्षक आणि खास डिझायनर पोशाख पाठवण्यात आला आहे.
बनारसी सिल्क कापडापासून आणि सुंदर मोत्यांचा वापर करून हा पोशाख तयार करण्यात आला आहे. तसेच रुक्मिणी मातेसाठी खास येवला पैठणी अर्पण करण्यात आली आहे. आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वतीने हा पोशाख श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
(नक्की वाचा- VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)
पहाटे 2.20 वाजता शासकीय महापूजा
आषाढी एकादशीच्या दिवशी होणाऱ्या शासकीय महापूजेच्या नियोजनाबाबत मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती दिली. पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न होईल.
महापूजेच्या पार्श्वभूमीवर रात्री 12.30 वाजता विठ्ठल मंदिर पदस्पर्श दर्शनासाठी तात्पुरते बंद केले जाईल. मात्र, महापूजेच्या संपूर्ण कालावधीत भाविकांसाठी विठुरायाचे मुखदर्शन अविरत सुरूच राहील. पहाटे पावणे चार वाजता महापूजा संपन्न झाल्यानंतर भाविकांसाठी विठुरायाचे पदस्पर्श दर्शन पुन्हा पूर्ववत सुरू केले जाईल. शासकीय महापूजेचे विधी व्यवस्थित पार पडण्यासाठी मंदिराच्या वतीने 7 पुजाऱ्यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?)
दर्शनासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
आषाढी एकादशीच्या तोंडावर विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची अभूतपूर्व आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळत आहे. विठ्ठलाची दर्शनरांग गोपाळपूरच्या पुढे रांजणी रोडवरील इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जाऊन पोहोचली आहे. सध्या दर्शन रांगेत साधारणपणे 60 हजारांहून अधिक भाविक** उभे असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रांगेत असणाऱ्या भाविकांना विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी सध्या तब्बल 16 ते 18 तासांचा वेळ लागत आहे. यंदा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर वारकरी आणि भाविक पंढरीमध्ये दाखल झाले असून, संपूर्ण पंढरपूर नगरी 'ज्ञानोबा-तुकाराम' आणि 'विठ्ठल-विठ्ठल'च्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world