ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Ashadhi Wari 2026: आषाढी वारी म्हणजे सेवा, समर्पण आणि अन्नदानाची परंपरा. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील दशरथ कुटुंबीय मागील ८० वर्षांपासून वारकऱ्यांना अन्नदान करत असून ही सेवा आता चौथ्या पिढीपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे ८० वर्षांपूर्वी ज्या भाकरी, पिठलं आणि शुद्ध शेंगदाण्याच्या तेलाचा प्रसाद दिला जात होता, तोच प्रसाद आजही वारकऱ्यांना दिला जातो.
आषाढी वारीत अन्नदानाची सेवा..!
राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शेकडो दिंड्या महिनाभर आधीच आपल्या आगमनाची माहिती देतात. पालखीचा काळ सुरू झाला की त्यांच्या घरात एखाद्या मोठ्या कौटुंबिक सोहळ्याचा माहोल निर्माण होतो. नातेवाईक आणि मित्रपरिवार अन्नदानासाठी मदतीला धावून येतात. दरवर्षी शेकडो दिंड्या त्यांच्या घरी येतात आणि हजारो वारकरी प्रेमाने दिलेल्या प्रसादाने तृप्त होऊन पंढरीच्या वाटेला लागतात. सोन्याचा व्यापार असतानाही पालखीच्या काळात दहा ते पंधरा दिवस ते व्यवसाय बंद ठेवून केवळ वारकरी सेवेलाच प्राधान्य देतात.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी येथे असेल. सासवड येथील मुक्कामानंतर आज पालखी जेजुरीकडे प्रस्थान करेल. जेजुरीमध्ये आध्यात्मिक प्रवचन आणि संध्याकाळचे भजनाचा कार्यक्रम पार पडेल. दुसरीकडे संत तुकाराम महाराज यांची पालखी वरवंड येथे असेल. वरवंड येथे पारंपारिक प्रार्थना आणि विसावा घेतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world