सूरज कसबे, प्रतिनिधी
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026: पुणे आणि परिसरातील पावसाचा वाढता जोर आणि नद्यांना आलेला पूर यामुळे यंदाच्या आषाढी वारी सोहळ्यामध्ये एक अत्यंत मोठा आणि अभूतपूर्व बदल करण्यात आला आहे. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या माऊलींच्या वारीबाबत प्रशासनाला आणि सोहळा प्रमुखांना सुरक्षेच्या कारणास्तव एक मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. दरवर्षी ज्या पारंपरिक वाटेने माऊलींचा रथ आणि वारकऱ्यांचा अथांग सागर पुढे सरकायचा, त्या मार्गात निसर्गाच्या कोपामुळे पहिल्यांदाच बदल करावा लागला आहे. हा बदल नेमका काय आहे आणि भाविकांना आता कुठून वारीत सहभागी व्हावे लागणार आहे, याची सविस्तर माहिती समोर आली आहे.
काय आहे बदल?
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे नदीवर असलेले चारही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. पाण्याखाली गेलेल्या या पुलांचे जोपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजेच तांत्रिक तपासणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत तिथून पालखी घेऊन जाणे अत्यंत धोक्याचे आहे.
यामुळेच सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने नवा मार्ग निश्चित केला आहे. जर पारंपरिक मार्गावरील पुलांचा अहवाल सकारात्मक आला नाही, तर पालखी मरकळ रोड मार्गे चऱ्होली फाट्यावर नेण्यात येईल. तिथून पुढे दिघी, विश्रांतवाडी आणि पुढे पुणे असा हा पालखीचा नवा प्रवास असणार आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत मोठे बदल, वाहनांना कुठे बंदी आणि कुठे परवानगी? वाचा सविस्तर )
भाविकांना आणि दिंडी प्रमुखांना महत्वाचे आवाहन
पालखी सोहळा प्रमुख ॲड राजेंद्र उमाप यांनी या बदललेल्या परिस्थितीबाबत सर्व वारकरी आणि दिंडी प्रमुखांना अत्यंत महत्त्वाची सूचना दिली आहे. पुलांची तपासणी झाल्याशिवाय पारंपरिक मार्गाने जाणे शक्य नसल्यामुळे, सर्व भाविकांनी आणि दिंडीतील वारकऱ्यांनी यंदा चऱ्होली फाट्यावरून वारीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ऐनवेळी होणारी धावपळ आणि गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी या नव्या मार्गाची नोंद घेऊन सहकार्य करावे, जेणेकरून सोहळा सुरक्षितपणे पार पडेल.
( नक्की वाचा : Nashik News: नाशिक वाचलं! महाभयंकर ढगफुटीचे संकट घोंघावत असताना 'या' एका स्वदेशी AI नं कसा घडवला चमत्कार? )
प्रस्थान सोहळ्याचे नियोजन आणि गर्दीवर नियंत्रण
यंदाचा हा प्रस्थान सोहळा आज दुपारी (बुधवार 8 जुलै) 3 वाजता पार पडणार आहे. पूर परिस्थिती आणि पावसाचा वाढता धोका लक्षात घेता, मंदिरात होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत. सुरुवातीला मानाच्या रथासमोरील 1 ते 27, रथामागील 1 ते 20 आणि पोटधारक अशा 56 दिंड्यांमधील केवळ 10 प्रतिनिधींना प्रवेश देण्याचे ठरले होते. मात्र, त्यानंतर या नियोजनात अंशतः बदल करण्यात आला असून आता प्रस्थान सोहळ्याच्या वेळी मानाच्या दिंड्यांमधील 50 जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे.