सुनिल दवंगे, प्रतिनिधी
Ashok Kharat Case: गेल्या 2 महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. हे प्रकरण थंड पडतेय असे वाटत असतानाच आता एका मोठ्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेली विशेष तपास समिती म्हणजेच एसआयटी (SIT) च बरखास्त झाल्याची धक्कादायक आरोप करण्यात आलाय. यामुळे या प्रकरणातील गुपिते आता दडपली जाणार का, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काय आहे आरोप?
महाराष्ट्रात गाजत असलेल्या खरात प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात वरून सर्व सेटिंग झाली आहे का, असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. दोन महिने उलटून गेल्यानंतरही या प्रकरणातील महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींच्या चौकशीचे काय झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशातच एसआयटी बरखास्त झाल्याची माहिती मिळत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. यामुळे आता चौकशी नेमकी कोणत्या दिशेला जाणार, असा संशय व्यक्त केला जात आहे.
( नक्की वाचा : Ashok Kharat Case: आरोपी नाही तर मदतीसाठी बोलावले; खरात प्रकरणात नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकाकडून मोलाची माहिती )
सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
साईबाबांच्या दर्शनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये अंजली दमानिया आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खरात प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर आणि तपास यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. हे प्रकरण गांभीर्याने घेतले जात असेल, तर मग अचानक तपास समिती का गुंडाळली जातेय, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
तटकरे आणि चाकणकरांवर थेट निशाणा
या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून दमानिया यांनी थेट नावांसह आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असून, त्यासाठी सुनील तटकरे प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. इतकेच नाही तर, जर जेलमध्ये असलेल्या खरातचे उद्या काही बरे-वाईट झाले, तर हा विषय तिथेच संपवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
खरात प्रकरणाचे भवितव्य काय?
अंजली दमानिया यांनी शिर्डीमध्ये केलेल्या या दाव्यांमुळे खरात प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. 2 महिन्यांच्या शांततेनंतर आलेल्या या वादळाने प्रकरणातील अनेक धागेदोरे पुन्हा चर्चेत आणले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी पुढे सुरू राहणार की दमानिया यांनी म्हटल्याप्रमाणे ती खरोखरच थंड पडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world