जाहिरात

Ashok Kharat: धक्कादायक! मंत्रिमंडळ निवडीतही खरातची लुडबुड? अजित पवारांच्या दरबारात थेट पोहोचला होता निरोप

Ashok Kharat Controversy: राज्याच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळावे हे ठरवण्यापर्यंत त्याची मजल गेली होती, असा खळबळजनक दावा NCP नेत्यानं केला आहे.

Ashok Kharat: धक्कादायक! मंत्रिमंडळ निवडीतही खरातची लुडबुड? अजित पवारांच्या दरबारात थेट पोहोचला होता निरोप
Ashok Kharat Controversy: अशोक खरातच्या राजकीय हस्तक्षेपाबाबतचं प्रकरण उघड झालं आहे.
मुंबई:

Ashok Kharat Controversy:  महाराष्ट्रच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने आता एक वेगळे वळण घेतले आहे. केवळ ज्योतिष बनून महिलांचे शोषण करण्यापुरताच खरात मर्यादित नव्हता, तर राज्याच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळावे हे ठरवण्यापर्यंत त्याची मजल गेली होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लावंडे यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून खरातचे धागेदोरे किती खोलवर पसरले आहेत, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात अशोक खरातचा हस्तक्षेप

विकास लावंडे यांनी केलेल्या आरोपानुसार, खरातचा राज्य सरकारच्या कामकाजात थेट हस्तक्षेप होता. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, यासाठी खरातने फिल्डिंग लावली होती. खरातने यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला होता आणि कोकाटे यांना मंत्री करू नका, असे सांगितले होते.

तटकरे यांनी हा निरोप अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवला, मात्र अजित पवार यांनी खरातच्या या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि कोकाटे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. माणिकराव कोकाटे यांना सुरुवातीला कृषी मंत्री करण्यात आले होते, परंतु नंतर रमी वादामुळे त्यांना क्रीडा विभागात हलवण्यात आले.


( नक्की वाचा : Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांचं राजकीय अस्त्र म्यान,भोंदूबाबा खरातमुळे सोडावं लागलं आणखी एक मोठं पद! )

अशोक खरात नेमका आहे कोण?

अशोक खरात हा मूळचा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होता, पण नंतर तो ज्योतिष बनला. शुद्धीकरणाच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. आतापर्यंत अनेक महिलांनी समोर येऊन त्याच्या काळ्या कृत्यांचा पाढा वाचला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली असून, आतापर्यंत डझनभर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेही नाव या प्रकरणाशी जोडले गेल्याने त्यांनी  पदाचा राजीनामा दिला आहे.

सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध

अशोक खरातचे संबंध केवळ एकाच पक्षाशी मर्यादित नसून, त्याचे जाळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये पसरलेले असल्याचे समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचे खरातचे फोटो व्हायरल झाले आहेत. इतकेच नाही तर जयंत पाटील, निलेश लंके आणि चंद्रकांत पाटील यांसारख्या बड्या नेत्यांसोबतही त्याचे फोटो समोर आले आहेत. महायुती असो वा महाविकास आघाडी, दोन्ही सरकारांच्या काळात खरातचा प्रभाव होता, असे दिसून येते.

सरकारी निर्णयातही खरातचे वजन

खरातचा हस्तक्षेप केवळ बदल्या किंवा मंत्रिमंडळापुरता मर्यादित नव्हता, तर सरकारी निर्णयांवरही त्याचा प्रभाव होता. 2020 मधील एक सरकारी आदेश आता समोर आला आहे, ज्यानुसार श्री शिवनिका संस्थानला पाणी वाटप करण्यात आले होते. हे संस्थान अशोक खरातशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे सरकत आहे, तसतसे अनेक बड्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणातून अजून किती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com