जाहिरात

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांचं राजकीय अस्त्र म्यान,भोंदूबाबा खरातमुळे सोडावं लागलं आणखी एक मोठं पद!

Rupali Chakankar Resignation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट)  नेत्या रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांचं राजकीय अस्त्र म्यान,भोंदूबाबा खरातमुळे सोडावं लागलं आणखी एक मोठं पद!
Rupali Chakankar Resignation: अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांना आणखी एक पद सोडावं लागलं आहे.
मुंबई:

Rupali Chakankar Resignation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट)  नेत्या रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबतचे कथित संबंध आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो-व्हिडिओ यामुळे चाकणकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून टीकेची झोड उठली होती. 

या वाढत्या राजकीय दबावामुळेच त्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना यापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला होता. आता पक्ष संघटनेतील महत्त्वाचे पदही त्यांच्या हातातून गेले आहे.

भोंदूबाबा प्रकरण आणि वाढत्या अडचणी

काही दिवसांपूर्वी नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यातील जवळीक दर्शवणारे अनेक पुरावे समोर आल्याचा दावा केला जात होता. दोघांचे एकत्रित असलेले फोटो आणि काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यामुळे विरोधकांनी चाकणकर यांना घेरलेच, पण स्वपक्षातही त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर उमटला होता. या प्रकरणाने गंभीर वळण घेतल्याने चाकणकर यांची प्रतिमा मलीन होत असल्याची चर्चा सुरू झाली आणि अखेर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.

( नक्की वाचा : Ashok Kharat : 'कुणावरही जबरदस्ती केली नाही, जे केलं ते...'; भोंदू खरातने पोलिसांना काय सांगितलं? वाचा सविस्तर )

ट्विट करत केली राजीनाम्याची घोषणा

रुपाली चाकणकर यांनी स्वतः ट्विट करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत स्पष्ट केले की, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवसापासून माझी भूमिका स्पष्ट आहे. त्याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा बेकायदेशीर कृत्यांत माझा दुरान्वयेही संबंध नाही. तपासादरम्यान या सर्व गोष्टी समोर येतीलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुराव्याशिवाय माध्यमांमधून होत असलेले आरोप अत्यंत वेदनादायक आहेत, पण सत्य लवकरच प्रखरतेने सिद्ध होईल, असेही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्ट  केले आहे.

सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चेनंतर घेतला निर्णय

या प्रकरणाचा तपास पारदर्शक आणि निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी चाकणकर यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली होती. मात्र, पक्षाची बाजू सावरण्यासाठी अखेर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी त्यांनी फोनद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतरच त्यांनी आपल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com