'तुतारी वाजवायची म्हणजे वाजवायची..' धोंडे बोलले, स्टेजवरचे पाहत राहिले

बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी त्यांच्या शिट्टी या चिन्हाऐवजी तुतारी वाजवण्याचे आवाहन केल्याचा प्रकार घडला. स्वतःचे निवडणूक चिन्ह विसरल्याने हा सगळा प्रकार झाला

जाहिरात
Read Time: 2 mins

मयुर बोरसे, प्रतिनिधी: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभा ऐन रंगात आल्या आहेत. जिल्ह्याजिल्ह्यात, गावागावात सभांचा धडाका सुरु आहे. प्रत्येक उमेदवार आपल्याच चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन करत आहेत. अशातच बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी त्यांच्या शिट्टी या चिन्हाऐवजी तुतारी वाजवण्याचे आवाहन केल्याचा प्रकार घडला. स्वतःचे निवडणूक चिन्ह विसरल्याने हा सगळा प्रकार झाला अन् जाहीर सभेत एकच गोंधळ पाहायला मिळाला. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर. 

बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे बंडखोर माजी आमदार भीमराव धोंडे अपक्ष विधानसभा निवडणूक लढवीत आहेत.त्यांनी प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत आपले चिन्ह विसरून कार्यकर्त्यांना तुतारी वाजवण्याचे आवाहन केले. मात्र ही बाब व्यासपीठावर बसलेल्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर लागलीच त्यांनी सारवासारव केली. चुकून तुतारीचा उल्लेख केला असं ते म्हणाले. पण सध्या त्यांच्या या भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. 

Advertisement

समोर आलेल्या माहितीनुसार, भीमराव धोंडे हे भाजपाचे माजी आमदार आहेत. मात्र यावेळी भाजपाने त्यांना उमेदवारी डावलून सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. अशातच त्यांच्याकडून प्रचाराची सुरुवात देखील झाली. आज आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते आपलं निवडणुकीतील चिन्ह विसरले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शरद पवार गटाचे चिन्ह असलेले तुतारी वाजवण्याचे आवाहन केले. निवडणुकीला फक्त १५ दिवस राहिलेत. गावोगावी फेरी काढायची,  वाड्यावस्त्यांना भेटी द्यायच्या आणि कसल्याही परिस्थितीत तुतारी वाजवायची म्हणजे वाजवायची असं ते म्हणाले. 

Advertisement

परंतु ही बाब कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सरवासावर करत आपल्या चिन्हाचा उल्लेख केला.परंतु सध्या मतदारसंघात त्यांचा हा व्हिडिओ आणि याची चर्चा चांगलीच जोर धरू लागलीय. भीमराव धोंडे यांचे आष्टी मतदारसंघात चल संस्थेच्या माध्यमातून चांगले प्राबल्य आहे. धोंडे हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. तसेच भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी देखील माझी लढत ही थेट शिट्टीशी असल्याचेही भाषणात म्हणाले होते. अशातच धोंडे यांनी जाहीर सभेत तुतारीच्या प्रचाराचे आवाहन केल्याने नेमकं त्यांच्या मनात चाललंय काय? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. 

Advertisement