सुजित आंबेकर, प्रतिनिधी
वाई-खंडाळा व माण मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज आमदार पृथ्वीराज चव्हाण, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदार व अन्य चार असे प्रमुख पक्षांचे दहा उमेदवार निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दिग्गज उमेदवार शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार असल्याने आजचा दिवस विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापवणारा ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी वाई- खंडाळा व माण मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांतील महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत.
मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी मतदारसंघातून समर्थक, कार्यकर्त्यांना साताऱ्यात बोलावण्यात आले आहे. गांधी मैदानावरून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. यावेळी खासदार उदयनराजे भोसले ही उपस्थित राहणार आहेत यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - बारामतीत काका विरुद्ध पुतण्यामध्ये लढत; दोन्ही पवार आज भरणार उमेदवारी अर्ज
कराड दक्षिणमधून मविआकडून काँग्रेसचे उमेदवार
पृथ्वीराज चव्हाण, कऱ्हाड उत्तरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बाळासाहेब पाटील व भाजपचे मनोज घोरपडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पाटणमधून शिवसेनेतर्फे पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हर्षद कदम व अपक्ष सत्यजित पाटणकर पाटण येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. फलटण मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने सचिन कांबळे- पाटील यांना उमेदवारी आज जाहीर केली. तेही आजच अर्ज भरणार आहेत. माण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेली नाही; परंतु भाजपकडून आमदार जयकुमार गोरे आज अर्ज दाखल करणार आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील आठपैकी सात मतदारसंघांत होणाऱ्या शक्तिप्रदर्शनाने राजकीय वातावरण तापणार आहे. वाई-खंडाळा मतदारसंघातूनही राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही, तसेच आमदार मकरंद पाटील हे उद्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या दिवशी त्यांचा वाढदिवसही आहे. त्यामुळे वाईमध्ये मंगळवारी शक्तिप्रदर्शन होणार आहे. कोरेगावमधून आमदार शशिकांत शिंदे, सातारा-जावळी मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमित कदम हेही उद्याच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.