बंडखोरांना दणका! राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट निलंबनाची कारवाई; कोण आहेत 'ते' 8 नेते?

जाहिरात
Read Time: 2 mins

 सागर कुलकर्णी, प्रतिनिधी:  महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधानसभेचा धुरळा उडत आहे. या विधानसभा निवडणुकीत इच्छुकांच्या बंडखोरीमुळे महायुती तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. अशा बंडखोर नेत्यांवर आता थेट कारवाई केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाने 40 बंडखोरांचे पक्षातून निलंबन केले होते. त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही  आठ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

सुनिल तटकरेंची मोठी कारवाई

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षातील आठ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षविरोधी भूमिका घेत महायुतीची प्रतिमा मलिन केल्याचा थपका ठेवत या आठ पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यालयाकडून याबाबचे अधिकृत पत्रकही जारी करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, नांदेड महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती पुजा व्यवहारे, धुळ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, दहिसर तालुकाध्यक्षा श्रीमती ममता शर्मा, तुमसर (भंडारा) तालुकाध्यक्ष धनेंद्र तुरकर, युवक प्रदेश सचिव आनंद सिंधीकर या नेत्यांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

नक्की वाचा: '... तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना थेट गोळ्या घातल्या असत्या' राणे हे काय बोलून गेले

दरम्यान, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती तसेच महाविकास आघाडीमधील इच्छुकांनी बंडासाठी दंड थोपटले होते. या बंडखोर उमेदवारांची समजूत काढताना पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक झाली होती. अगदी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या नेत्यांची मनधरणी सुरु होती. मात्र त्यानंतरही काही नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. अशा बंडोबांवर आता कारवाई केली जात आहे.  याआधी भारतीय जनता पक्षानेही पक्षातील बंडखोरांवर मोठी कारवाई केली होती. भाजपने राज्यातल्या विविध भागातील 37 मतदार संघामधील 40 नेत्यांचे तडकाफडकी निलंबन केले होते. 

Advertisement

ट्रेंडिग बातमी: 'महायुतीच्या उमेदवाराकडून पैसे घ्या पण मतदान मात्र...' पवारांसमोर काय घडलं?