स्वानंद पाटील, बीड: राज्याचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी सर्वात मोठा विजय मिळवत मतदार संघावर मुडेंचाच बोलबाला असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा 1 लाख 40 हजार 224 मतांनी दारुण पराभव करत त्यांनी हा विजय मिळवला आहे. शरद पवार यांनी स्वतः लक्ष देऊनहीं धनंजय मुंडे यांचा झालेला रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवत मुंडेंनी शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात सुरेश धस यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे,भाजपाचे बंडखोर भीमराव धोंडे असे तेहेरी आव्हान असतानाही 77975 ऐवढे मताधिक्य मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे मिळवला आहे.तर गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पंडित यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बदामराव पंडित आणि लक्ष्मण पवार यांचा पराभव करत 42390 मतांचे मताधिक्य मिळवले आहे.
नक्की वाचा: CM पदावरुन राडा ते जागा वाटपाचा घोळ; मविआच्या दारुण पराभवाची 5 मोठी कारणे
माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांना आपला गड राखण्यात यश आले आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांचा 5899 मताधिक्यांनी पराभव केला आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार नमिता मुंदडा अटीतटीच्या लढाईत निसटचा विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुरज साठे यांचा 2687 मतांनी पराजय केला.
बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीला फक्त एकच जागा राखता आली ती म्हणजे बीडची या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांनी चुलत भाऊ योगेश क्षीरसागर यांचा 6881 मतांनी पराभव करत आपली आमदारकी कायम राखली आहे. योगेश क्षीरसागर यांना जयदत्त क्षीरसागर यांची साथ भेटून देखील संदीप क्षीरसागर यांचा झालेला विजय त्यांच्यासाठी महत्वाचा मानला जात आहे.