प्रतीक्षा पारखी
पुणे ही गुणरत्नांची खाण आहे. इथे टोमणेही दर्जेदार मारले जातात आणि टोमण्यांना उत्तरही अतिदर्जेदार दिली जातात. पुण्यामध्ये कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा पाच पन्नास गुंडांचा गेल्या काही वर्षात प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र याच पुण्यात आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर समोरच्यावर शाब्दीक हल्ले करून त्याला पुरता घायाळ करण्याची पुणेकरांची सवय फार जुनी आहे. पुणेकर हिंसेचा पुरस्कार करण्यापेक्षा आपल्या जिभेची आणि बुद्धीची धार अधिक तीव्र करण्यावर भर देत असतात.
पुणेकरांना हिणवण्यासाठी असे म्हणतात की पुणेकर दुपारी 1-4 या वेळेत झोपतात. काहीही झाले तरी ते आपला हा शिरस्ता मोडत नाही. मात्र त्यांना कोणी 'अरे' केले की त्याला 'कारे' करण्यासाठी अंथरुणात पडल्या पडल्या त्यांच्या मस्तिष्कात सरस्वती सतत संचार करत राहाते. सभ्य सुसंस्कृत महाराष्ट्रात लोकशाहीचे मंदीर असलेल्या विधीमंडळात शिवीगाळीचे प्रसंग घडतात मात्र पुणेकर आपला दर्जा आणि आब राखत शिवराळ, उथळ मार्ग अजिबात न निवडता समोरच्याला झोडपून काढतात.
पाट्या या माहितीसाठी दिशादर्शनासाठी असतात, मात्र पुणेकरांनी या पाट्यांना आपली आयुधे बनवली आहेत. पाट्यांवरचा मजकूर वाचल्यानंतर ती पाटी वाटणाऱ्याच्या मनात लज्जा उत्पन्न होतेच शिवाय ही परिस्थिती ओढावण्यापूर्वी धरणीमातेने आपल्याला उदरात का सामावून घेतले नाही असा प्रश्नही निर्माण होतो. पुण्यातील प्रभात रोड हा जगात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह इतकाच प्रसिद्ध आहे. याच प्रभात रोडवरील एका उद्यानात पाट्यांचं युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालंय.
प्रभात रस्त्यावर असलेल्या हिरवाई उद्यानात पुणेकर कालपर्यंत फिरायला, व्यायाम करायला किंवा दोन क्षण विरंगुळ्याचे मिळावेत यासाठी यायचे. मात्र या उद्यानातील पाटी युद्धामुळे उद्यापासून इथे येणारी मंडळी फक्त पाट्या वाचून त्यावरील मजकुराचा आनंद लुटत आवडत्या पाटीला दाद देण्यासाठी येणं सुरू करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या उद्यानात कालपर्यंत एक फलक लावण्यात आला होता. यावर लिहिले होते की, "महिलांनो, असे कपडे घाला की; कोणी वाईट नजरेने बघता कामा नये- सौजन्य: मस्त ग्रुप"
हा फलक पाहिला आणि काही पुणेकरांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या फलकाला उत्तर देण्यासाठीची रणनिती ठरली आणि काही तासांत दुसरा फलक लागला. दुसऱ्या फलकावर लिहिले होते की, "पुरुषांनो! मन इतके निखळ ठेवा की कुणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये- त्रस्त ग्रुप"
मस्त ग्रुप आणि त्रस्त ग्रुपच्या या फलक युद्धाकडे पाहताना पुणेकर आपापली मते नोंदवत आहेत. अनेक जण या फलकांसमोर उभे राहून शब्दन् शब्द बारकाईने वाचून आपल्या तल्लख मेंदूच्या विशाल कोनाड्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. उद्या कुठे शाब्दीक राडा झालाच आणि आपल्यावर उत्तर देण्याची किंवा प्रश्न विचारण्याची वेळ आली तर असली शब्दरुपी शस्त्रे आपल्या म्यानेत तयार असावीत ही त्यांची भावना आहे.