देवा राखुंडे, प्रतिनिधी
Baramati News : बारामतीतून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बारामतीच्या मोरगावमधील रयत शिक्षण संस्थेचा (Rayat shikshan sanstha) आहे. शिक्षण संस्थेत मुलं शिक्षणासाठी येत असतात. मात्र या शिक्षण संस्थेच्या प्रांगणात झालेल्या एका कार्यक्रमात नाचाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब (Rayat shikshan sanstha Shocking Video) म्हणजे नाचताना ही डान्सर अश्लिल हावभाव करीत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून संताप व्यक्त केला आहे.
सध्या बारामती तालुक्यातील मोरगाव येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातील मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ मे महिन्यातील असून गावच्या ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मनोरंजनाच्या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाचा आहे.मात्र या व्हिडिओवरून सोशल माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रयत शिक्षण संस्थेअंतर्गत राज्यात अनेक ठिकाणी विद्यालयं चालवली जातात. ही राज्यातील एक नावाजलेली संस्था आहे. त्याअंतर्गत बारामती तालुक्यातील मोरगावमध्ये मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चालवलं जातं आणि याच विद्यालयाच्या प्रांगणात हा मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला.
नक्की वाचा - Crime News: इंस्टाग्रामवर मैत्री, ब्लॅकमेल अन् अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, पुढे जे घडलं ते...
विशेष म्हणजे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या रयत शिक्षण संस्थेचा कारभार पाहतात. त्यामुळे विरोधकांकडून या व्हिडिओला धरून काही राजकीय प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. बारामती तालुक्यातील मोरगाव हे एक रहदारीचे ठिकाण आहे.
अष्टविनायकापैकी एक श्री गणेशाचं मयुरेश्वराचे मंदिर त्या ठिकाणी आहे. मयुरेश्वराच्या दर्शनाला राज्यभरातून भाविक येत असतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच गजबज असते. ग्रामपंचायतीकडे स्वतंत्र असं स्वतःचं मोठं मैदान नसल्याने गावच्या ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त जे काही मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. ते वर्षानुवर्ष याच विद्यालयाच्या प्रांगणात पार पडतात अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. आणि याला अनेक वर्षाची परंपरा असल्यासही स्थानिक सांगतात.