आकाश सावंत, बीड
Beed News: मराठा आरक्षण आंदोलनावरून आता थेट अंतर्गत आरोप-प्रत्यारोपांची मोठी ठिणगी पडली आहे. मराठा आंदोलक अमोल खुने यांनी थेट मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांवर गंभीर आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचे आरोप केले आहेत. या आरोपामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
"हे उपोषण समाजासाठी नाही, तर टेंडरसाठी!"
माध्यमांशी बोलताना अमोल खुने यांनी थेट सवाल उपस्थित केला की, "हे उपोषण मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नसून, रद्द झालेले 900 कोटी रुपयांचे टेंडर पुन्हा मिळवण्यासाठीच सुरू आहे का?"
अमोल खुने एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही निशाणा साधला. "हे मनोज जरांगे यांचे नववे-दहावे उपोषण आहे. प्रत्येक वेळी मराठा समाजाच्या नावाखाली सामान्य लोकांना केवळ भावनिक केले जाते आणि स्वतःचे हित साध्य केले जाते," असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
(नक्की वाचा- Pune Liquor Tragedy: विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलीस अधिकारी निलंबित, नावे आली समोर)
थेट 'नार्को टेस्ट'चे आव्हान
अमोल खुने यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी पांडुरंग तारख, गंगाधर काळकुटे आणि संजय कटारे यांच्या संपत्तीवर थेट बोट ठेवले आहे. "इतक्या कमी कालावधीत या लोकांकडे एवढी मोठी मालमत्ता आणि संपत्ती आली कुठून?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला हा सर्व प्रकार समोर आणण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. खुने म्हणाले, "माझ्यासह मनोज जरांगे, पांडुरंग तारख, गंगाधर काळकुटे आणि संजय कटारे या सर्वांची 'नार्को टेस्ट' करण्यात यावी आणि या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी केली जावी."
"...तर साड्या घालून धिंड काढा!"
आपल्या आरोपांवर ठाम राहत अमोल खुने यांनी अत्यंत आक्रमक आणि उघड भूमिका घेतली आहे. त्यांनी प्रशासनाला आणि समाजाला थेट आव्हान देताना म्हटले की, "जर या चौकशीत आणि नार्को टेस्टमध्ये मी दोषी आढळलो, तर मला हवी ती कठोर शिक्षा द्या. परंतु, जर मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी दोषी निघाले, तर त्यांची साड्या घालून भरचौकात धिंड काढण्यात यावी."
(नक्की वाचा- VIDEO: "मी रील स्टार आहे, माझी गाडी का अडवली?", टोलमाफीसाठी क्रिएटरची चिंधीगिरी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत)
बीडमधील वातावरण तापले
मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरे अध्यादेशावरून महाराष्ट्रात आधीच वातावरण संवेदनशील आहे. आता या आरोपामुळे बीडमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले असून, आता मनोज जरांगे पाटील किंवा त्यांचे सहकारी यावर काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world