आकाश सावंत, बीड
बीड जिल्ह्यातील विलास घुले खून प्रकरणानंतर जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर जिल्ह्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच दरम्यान, एका कथित ऑडिओ क्लिपमुळे बीडमधील राजकारणात आणि मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या व्हायरल कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना थेट जीवे मारण्याची भाषा करण्यात आली आहे.
बीडमधील विलास घुले प्रकरणाची पार्श्वभूमी
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे परळीतील समर्थक बाळासाहेब पाथरकर यांनी रमेश घुले यांच्यावर 'एमपीडीए' (MPDA) अंतर्गत कडक कारवाई झाली पाहिजे, अशी जाहीर मागणी केली होती. रमेश घुले यांच्यावर दाखल असलेले गुन्हे आणि वाल्मीक कराड यांच्यासोबत समोर आलेल्या फोटोनंतर बीडचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर, एका अज्ञात व्यक्तीने थेट खासदार समर्थकाला (बाळासाहेब पाथरकर) फोन लावला आणि या फोन संवादादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.
(नक्की वाचा- Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प; रेल्वे वाहतूकही विस्कळीत)
कॉल रेकॉर्डिंगमधील धक्कादायक संभाषण
व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने बाळासाहेब पाथरकर यांच्याशी वाद घालताना थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. संभाषण करणाऱ्या व्यक्तीने अत्यंत चिडून, "त्या चौथी पास जरांगेला तर गोळी मारायला लागतेय...", असे चिथावणीखोर वक्तव्य केले. एवढ्यावरच न थांबता या रेकॉर्डिंगमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील शिवीगाळ करण्यात आली आहे.
(नक्की वाचा-Mumbai Rain: मुंबईला पावसाचा रेड अलर्ट! सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी, खासगी कंपन्यांचं काय? )
मराठा संघटना आणि जरांगे समर्थक आक्रमक होणार?
मराठा आरक्षणासाठी राज्यभर रान उठवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल 'गोळी मारण्याची' भाषा आणि अश्लील शिवीगाळ झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बीड जिल्ह्यातील मराठा समाज आणि जरांगे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील दोषी व्यक्तीचा शोध घेऊन प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world