आकाश सावंत, बीड
बीड शहरातून एक धक्कादायक आणि तितकीच गंभीर घटना समोर आली आहे. आपल्या वाट्याची जमीन मिळावी म्हणून एका भावाने चक्क आपल्या पत्नीलाच बुरखा घालून बहीण म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात उभे केले. या फसवणुकीद्वारे त्याने बहिणीची जमीन आपल्या नावावर करून घेतली, मात्र अखेर कायद्याच्या कचाट्यात हा भाऊ अडकला आहे.
काय आहे हे प्रकरण?
बीड तालुक्यातील माळापुरी येथील आबेद खान याच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर, वारसा हक्काने जमिनीची नोंद आबेद आणि त्याच्या बहिणीच्या नावे झाली होती. मात्र, संपूर्ण जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी आबेदने एक कुटील डाव रचला. 24 ऑक्टोबर 2024 ची घटना आबेदने बीड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात (रजिस्ट्री ऑफिस) आपल्या पत्नीला, वाहिदा हिला घेऊन गेले.
पत्नीला बुरखा घालून उभे केले आणि तीच आपली बहीण असल्याचे अधिकाऱ्यांना भासवले. बुरखा परिधान केलेल्या पत्नीने तिथे बहिणीच्या नावे खोट्या सह्या केल्या आणि 'सोडपत्र' (Release Deed) नोंदवून घेतले. यामुळे बहिणीच्या हिशाची जमीनही आबेदच्या नावावर झाली.
न्यायालयाच्या चकरा आणि पोलिसांची कारवाई
हा प्रकार जेव्हा मूळ बहिणीच्या लक्षात आला, तेव्हा तिने धक्का बसून न्यायालयात धाव घेतली. आपल्या हक्काच्या जमिनीसाठी तिने कायदेशीर लढाई लढली. पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर, न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार, बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आबेद खान आणि त्याची पत्नी वाहिदा यांच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Saamana Editorial : लॉकडाऊन होईल का? सामनातून राज्यातील सद्यस्थितीवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा)
महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील पडताळणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बुरखा घातलेल्या महिलेची ओळख नीट न पटवता जमिनीचे हस्तांतरण कसे झाले, याचीही चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, यामध्ये कोणा शासकीय कर्मचाऱ्याचा सहभाग आहे का, हे देखील तपासले जाणार आहे.