स्वानंद पाटील,बीड
बीडमधील जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात 1 कोटीची लाच मागणारा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या चाणाक्यपुरी येथील घराता मोठं घबाड सापडलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी 5 ते रात्री 2 वाजेपर्यंत ही कारवाई केली. यामध्ये 1 कोटी 08 लाख रुपयांच रोकड, सोन्याची बिस्किटे व 970 ग्रॅम दागिने, 5.50 किलो चांदी सापडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या दागिन्यांव्यतिरिक्त इंदापूर, बारामती येथे फ्लॅट, बारामती व परळी येथे प्लॉट, इंदापूर येथे गाळा यासह इतर मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी हरिभाऊ खाडे फरार आहे. विशेष न्यायालय बीड यांचेकडून सीआरपीसी कलम 100 नुसार सर्च वॉरंटच्या आधारे खाडेच्या घराची पंचा समक्ष झडती घेतली असता वरील मुद्देमाल सापडला आहे. खाडे यांच्या सांगण्यावरून 5 लाखाची लाच घेताना पकडलेला कुशल जैन याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
(नक्की वाचा- 8 टीम 3 राज्यं... भावेश भिंडेला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी असं विणलं जाळं)
काय आहे प्रकरण?
शाळेच्या बांधकामात साहित्य पुरवल्याची मोबदला रक्कम जिजाऊ मल्टिस्टेटचा अपहार असल्याचे भासवून गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली होती. प्रकरण मिटवण्यासाठी 1 कोटी रुपयांची लाच मागण्यात आली होती. याप्रकरणी एका खासगी व्यक्तीसह बीड आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बीड लाचलुचपत विभागाने कारवाई केली. या प्रकरणात 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, तडझोडीनंतर 30 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यातले 5 लाख रूपये घेताना कुशाल जैन याला मौजकर टेक्सटाईल या दुकानातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांने हे पैसे हरिभाऊ खाडे यांच्या सांगण्यावरून घेतल्याचे सांगितले.
(नक्की वाचा - 15000 पगारात बना करोडपती; EPF मधील गुंतवणुकीचं गणित समजून घ्या)
दरम्यान हरिभाऊ खाडे आणि हवालदार जाधवर यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, साहाय्यक फौजदार रविभूषण जाधवर, कुशल जैन हे तिघे आरोपी असून या तिघांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे बीडचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या पथकाने केली आहे.