जाहिरात
This Article is From May 17, 2024

8 टीम 3 राज्यं... भावेश भिंडेला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी असं विणलं जाळं

मुंबई पोलिसांच्या या ऑपरेशनची उदयपूर पोलिसांंनाही माहिती नव्हती.

8 टीम 3 राज्यं... भावेश भिंडेला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी असं विणलं जाळं
भावेश भिंडेला उदयपूरमध्ये अटक करण्यात आली.
मुंबई:

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील प्रमुख आरोपी भावेश भिंडेला शुक्रवारी मुंबई पोलिसांनी उदयपूरमधून अटक केली. सोमावारी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तीन दिवस भिंडे फरार होता. त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी आठ टीमची नियुक्ती केली होती. अखेर त्याला उदयपूरमध्ये गुन्हे शाखेच्या विशेष टीमनं अटक केली. 

मुंबई पोलिसांकडून भावेशला शोधण्यासाठी संपूर्ण देशभर सर्च मोहीम राबवण्यात येत होती. तो अखेर उदयपूरच्या हॉटेलमध्ये लपलेला सापडला. गुन्हे शाखेचं हे अभियान अतिशय गुप्त होतं. उदयपूर पोलिसांनाही याचा पत्ता नव्हता. घाटकोपरमध्ये  सोमवारी कोसळलेलं होर्डिंग हे अनधिकृत होतं. होर्डिंगखाली चिरडून झालेल्या 16 जणांच्या मृत्यू प्रकरणात भावेश मुख्य आरोपी आहे. भावेशला अटक केल्यानंतर मुंबईला नेण्यात आलंय.

( नक्की वाचा : घाटकोपर दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक )

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावेश भिंडे सुरुवातीला मुंबईहून ड्रायव्हरसोबत लोनावळाला पळून गेला होता. त्यानंतर तो ठाण्याला गेला. त्यानंतर अहमदाबादमध्ये एका नातेवाईकाच्या घरी थांबला. उदयपूरमधल्या हॉटेलमध्ये त्याचा पुढचा स्टॉप होता. त्या हॉटेलमध्येच त्याला अटक करण्यात आली. उदयपूरच्या हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी भावेशनं त्याच्या भावाची मदत घेतली होती.

मुंबईत सोमवारी झालेल्या वादळामध्ये घाटकोपरमध्ये भावेशच्या कंपनीनं लावलेलं होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला तर किमान 74 जण जखमी झाले. भावेश भिंडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडटचा मालक असून त्याच्या कंपनीनं हे होर्डिंग उभारलं होतं.  या दुर्घटनेत एफआयआर दाखल झाल्यापासूनच भावेश फरार होता. त्याच्या विरोधात यापूर्वीच 20 पेक्षा जास्त प्रकरणात गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये एका बलात्काराच्या प्रकरणाचा समावेश आहे. 

घाटकोपरच्या पेंट्रोलपंपाजवळ पडलेल्या या होर्डिंगचा आकार  120X120 फुट होता. त्यासाठी या होर्डिंगचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश करण्यात आला होता. दुसरिकडं आम्ही 40X40 फुट आकारापेक्षा मोठ्या होर्डिंगला परवानगी देत नाही, असं  मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com