
अक्षय सावंत, बीड: बीडच्या केज- अहमदनगर महामार्गावर एका मद्यधुंद अवस्थेतील कंटेनर चालकाने अनेकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या थरारामध्ये 15 जण जखमी झाले असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने कंटेनर पेटवून दिला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बीडच्या केज-अहमदपूर रस्त्यावर कंटेनरचा थरार पाहायला मिळाला. दारूच्या नशेत असलेल्या कंटेनर चालकाने केज शहरापासून लोखंडी सावरगाव पर्यंतच्या 26 किमी अंतरामध्ये अनेकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनेक वाहनांना कंटेनरने जोराची धडक दिली. ज्यामध्ये 15 जण जखमी झाले असून 1 जण ठार झाल्याची माहिती केज पोलिसांनी दिली आहे.
तब्बल 26 किलोमीटर सुरु असलेल्या या थरारानंतर शेवटी लोखंडी सावरगाव परिसरातील शेतात जाऊन कंटेनर पलटला. कंटेनर पलटी झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनरला आग लावली. याबाबतची माहिती मिळताच केज पोलिसांसह अग्निशामक दल आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.
( नक्की वाचा : भारतासोबत फक्त 18 मे पर्यंत शस्त्रसंधी, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं वक्तव्य! )
अपघातामध्ये कंटेनर चालक जखमी झाल्याने अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच इतर जखमींवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामधील काही जखमींना केज तर काहींना अंबाजोगाई रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world