आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News : उच्चपगाराच्या आमिषाला बेरोजगार तरुण कसे बळी पडतात याचा धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आला आहे. फेसबुकवरील नोकरीच्या जाहिरातीला भुलून बँकॉकला गेलेल्या बीडमधील एक २४ वर्षीय तरुणाला म्यानमार सीमेवर डांबून ठेवल्याच्या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय वळण मिळाले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने थेट तपासात उडी घेतली आहे. 'आयबी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीड सायबर पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. त्यामुळे तपासाला आता गती आली आहे.
बीडमधील ग्राफिक डिझायनरचं शिक्षण घेतलेल्या या तरुणाला 70 हजारांच्या नोकरीचं आमिष दाखवून 4 जून 2026 रोजी बँकॉकला बोलावून घेण्यात आलं होतं. मात्र, तिथून त्याला थायलंड-म्यानमारच्या सीमेवरील अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं. तिथे त्याच्याकडून जबरदस्तीने ऑनलाईन फसवणुकीचं काम करून घेतलं जात असून दररोज 16 ते 18 तास राबवून करंटचे झटके दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
800 भारतीय तरुण अडकले...
स्वप्नीलने दिलेल्या माहितीनुसार, म्यानमार सीमेवरील छळ-छावणीत सध्या 800 भारतीय तरुण अडकलेले असून त्यात महाराष्ट्रातील 20 ते 25 जणांचा समावेश आहे. तसेच तिथे 2 ते 3 जणांना मारून टाकण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. भारतीय तरुणांना ओलीस ठेवून आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचे रॅकेट चालवले जात असल्याने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने 'आयबी' सक्रिय झाली आहे. बीड सायबर पोलिसांच्या मदतीने या आंतरराष्ट्रीय एजंटसच्या जाळ्याचा छडा लावण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.
आमदार धनंजय मुंडेंकडून गंभीर प्रकरणाची दखल...
मोठ्या पगाराचं आमिष दाखवून नेलेल्या या तरुणांकडून जबरदस्तीने सायबर गुन्हे करून घेतले जात असल्याची माहिती आहे. या गंभीर प्रकरणाची माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने सर्व तरुणांची तातडीने सुखरूप सुटका करावी, तसेच मानवी तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेट आणि महाराष्ट्रातील एजंटांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.