Beed News : वटपौर्मिणेचा सण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी वडाची मनोभावे पूजा करतात. यादिवशी विवाहित महिला नटून-थटून वडाची पूजा करतात. या दिवशी उपवास करून वडाला पांढरा धागा गुंडाळून सात फेऱ्या मारतात. सर्वसाधारणपणे महिला वडाची पूजा करताना तुम्ही पाहिलं असेल. बीडमध्ये मात्र एका तरुणाने वडाच्या झाडाला फेऱ्या घातल्या आहे. यावेळी त्याने वडाच्या झाडाकडे भन्नाट साकडं घातलं आहे.
'४५ वर्षांचे टगे, खुले सांड...', लग्नासाठी तरुणाचं वडाला साकडं...
वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून "जन्मोजन्मी हाच पती लाभावा" अशी मनोभावे प्रार्थना करतात. पण बीडमधील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने याच परंपरेला विनोदी वळण देत थेट वडाच्या झाडालाच प्रश्न विचारला आहे. लग्न जमत नसल्याने हतबल झालेल्या या तरुणाने वडाला साकडं घालत, महिलांना सात जन्मांसाठी तोच नवरा मिळतो... पण आमचं पहिलं लग्न तरी कुणाशी होणार? असा मिश्कील सवाल केला आहे. ४०-४५ वर्षांचे टगे, खुले सांड हिंडत असतात, त्यांचेही लग्न होत नाहीत. सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे आमची हात जोडून तुझी विनंती आहे की, तू तरी आमच्याकडे लक्ष दे, अशी मागणी तरुणाने वडाच्या झाडाकडे केली आहे.
या अनोख्या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काहींनी त्याच्या भावना समजून घेतल्या, तर अनेकांनी भन्नाट मीम्स आणि मजेशीर प्रतिक्रिया देत या व्हिडिओचा आनंद लुटला. वटपौर्णिमेच्या दिवशी हा तरुण मात्र आपल्या "सौभाग्यवतीच्या शोधासाठी" वडालाच साकडं घालताना दिसल्याने बीडमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world