- अजित पवारांनी स्वीय सहाय्यकांच्या तुटपुंज्या पगारवाढीसाठी 2012 मध्ये मोठा निर्णय घेतला होता
- विधिमंडळाच्या सचिवांनी प्रस्तावित पगारवाढीला विरोध करून फक्त थोडकाच वाढीसाठी प्रयत्न केले
- फडणवीस आणि महाविकास आघाडी सरकारांतही स्वीय सहाय्यकांच्या पगारवाढीला अजित पवारांनी पुढाकार घेतला होता
आकाश सावंत
अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं पर्व संपलं आहे. प्रशासनावर मजबूत पकड असलेला, कडक शिस्तीचा हा नेता आतून किती हळवा आणि माणुसकी जपणारा होता, याचा प्रत्यय अनेकांना आला. तशीच एक आठवण धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी सांगितली आहे. ते सांगतात दादांचा असाच एक अनुभव आम्हाला 2012 साली आला. त्यावेळी त्यांनी मंत्रालयातील सर्व स्वीय सहाय्यकांच्या पगारवाढी संदर्भातल्या प्रश्नाचा एक अनुभव यावेळी व्यक्त केला आहे.
जोशी सांगतात, त्यावेळी आम्ही आमदारांचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून नुकतेच रुजू झालो होतो. केवळ 7,825 रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर घर चालवणं अवघड होतं. पगारवाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. ही फाईल जेव्हा अजित दादांकडे आली, तेव्हा त्यांनी जे केलं, ते केवळ दादाच करू शकतात असं ही ते म्हणाले. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये सचिवांनी अवघ्या 2 ते 2.5 हजार रुपयांच्या वाढीचा प्रस्ताव मांडला होता. तो प्रस्ताव ऐकताच दादा त्यांच्या खास शैलीत कडाडले. “अरे, 10 हजारात काय होतं? ही पोरं कुठे जाणार? थेट 15 हजारांचा प्रस्ताव द्या! असं ठणकावून सांगितलं होतं.
त्यानंतर एका क्षणात आमचा पगार दुप्पट झाला. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे, त्या निर्णयाने आम्हाला जगण्याचा आत्मविश्वास आणि कामाचा आत्मसन्मान मिळाला. दादांचं दातृत्व इथेच थांबलं नाही असं ही जोशी यांनी सांगितलं. फडणवीस सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार यांनी वेतन 25 हजार रुपये केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये दादांनी पुन्हा पुढाकार घेत हे वेतन 30 हजार रुपये केलं. आणि विशेष म्हणजे, मागील वर्षी अर्थसंकल्पात हे वेतन 40 हजार रुपये करण्याचा त्यांचा ठाम मानस होता. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या. यावर्षी ते नक्कीच प्रत्यक्षात उतरलं असतं. कारण ते शब्दांचे पक्के दादा होते.
पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. या निर्णयाची अंमलबजावणी होण्या आधीच काळाने त्यांना आमच्यातून हिरावून नेलं. सामान्य माणसाच्या पोटाचा विचार करणारा, पदापेक्षा माणूस मोठा मानणारा असा नेता पुन्हा होणं कठीण आहे.भावपूर्ण श्रद्धांजली दादा अशा शब्दात जोशी यांनी आपली श्रद्धांजली वाहीली आहे. तुमचे उपकार आमची पिढी कधीच विसरणार नाही. “हज़ारों साल नर्गिस अपनी बे-नूरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदा-वर पैदा।” याचाच अर्थ हजारो वर्षे निसर्ग वाट पाहतो, तेव्हा कुठे एखादा असा कर्तृत्ववान माणूस जन्माला येतो अशा शब्दात आपल्या भावना आणि आठवणी जोशी यांनी मांडल्या.