मोसीन शेख, बीड: मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 133 दिवस उलटून गेलेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून तब्बल चार महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याचा घातपात झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. अशातच मस्सजोगमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून संतोष देशमुखांच्या घरात एका अज्ञात महिलेने एन्ट्री करत रात्रभर ठाण मांडल्याचे समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे आहेत म्हणत ठाण मांडून बसल्याचे समोर आले आहे. सदरील अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी 06 वाजता देशमुख कुटुंबीयांच्या घरासमोरील मंडपात दाखल झाली. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुरूवातीला केला.
रात्रभर देशमुख यांच्या मंडपात मुक्काम केल्यानंतर त्या महिलेने आंघोळीसाठी बाथरुम वापरण्याचा हट्ट केला. देशमुख कुटुंबियांकडून दुसऱ्या बाथरुमची सोय करण्यात आल्यानंतरही त्या महिलेने घरातील बाथरुममध्येच आंघोळ करण्याचा हट्ट धरला, त्यामुळे त्यांना वेगळीच शंका येऊ लागली. याबाबत धनंजय देशमुख यांनी पोलिसांसह गावकऱ्यांनाही माहिती दिली.
यानंतर ती देशमुखांचा घराच्या परिसरात बसुन राहिली. रात्रभर मंडपात झोपली अखेर सकाळी केज पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसुन निघुन गेली. मात्र सदरील मी महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे.
दरम्यान, या महिलेबाबत आम्ही रत्नागिरी पोलिसांनाही कळवले असून ते या महिलेबाबत माहिती घेत आहेत. तसेच कृष्णा आंधळेचा ठावठिकाणा माहित असल्याचे त्यांनी तिकडच्या पोलीस ठाण्यातही सांगितल्याचे धनंजय देशमुख म्हणालेत. पोलीस सध्या तिच्या माहितीची शहानिशा करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
ट्रेंडिंग बातमी - Rane vs Rane: 'राणे बंधू एकमेकांच्या उरावर बसणार' माजी खासदार असं का बोलले?