
सिद्धिविनायक बिडवलकर यांची झालेली हत्या, त्यानंतर सावडाव इथं शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यांना झालेली मारहाण यामुळे सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणानंतर राणे कुटुंब विरोधकांच्या निशाण्यावर आहे. सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत, कुटुंबातच कसे वाद आहेत हे जाहीर पणे सांगितले आहेत. त्यामुळे राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. राऊत हे राणे कुटुंबीयांना डिवचण्याची एक ही संधी सोडत नाहीत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दादागिरी, दहशत, खून, मारामाऱ्या जाळपोळ बलात्कार भ्रष्टाचार यामुळे 2014 पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात बदनाम होता, असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यावेळी अनेक खून पचवले जात होते. हे सगळं पाप नारायण राणे आणि त्यांचे गुंडगिरी करणारे कार्यकर्ते यांचे होते असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. 2014 नंतर ही परिस्थिती बदलली होती. सिंधुदुर्ग जिल्हा सुसंस्कृत लोकांचा जिल्हा अशी प्रतिमा तयार झाली होती. नारायण राणेच्या कुटुंबाच्या हाती सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा गुंडाचा, हत्यारांचा जिल्हा म्हणून जुन्या मार्गांवर जातोय का ? असा प्रश्न या निमित्ताने राऊत यांनी उपस्थित करत नवा वाद निर्माण केला आहे.
जिल्ह्यात बिडवलकर हत्या, सावडाव मारहाण प्रकरणाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आवाज उठवला आहे. बिडवलकर खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो बिनधास्त पणे बरळतोय. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने मागील पाच वर्षात त्याने काय केलं, याचा शोध पोलीसांनी घ्यावा असं ही राऊत म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ता एकाच कुटुंबाच्या हातात आल्याने स्वैराचार माजवीणाऱ्यांचा बिमोड केला पाहिजे असं ही ते म्हणाले. सावडावमध्ये सामाजिक काम करणाऱ्या सावंत कुटुंबीयांना, ज्या पद्धतीने मारहाण केली ते गुंड राजरोस पणे जिल्ह्यात फिरत आहेत. पालकमंत्र्यांचे आश्रयदाते असल्याने त्याची दाखल घेतली नाही असा आरोप ही यावेळी राऊत यांनी केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन राणे बंधुंमध्ये भाजपा वाढवायची कि शिवसेना वाढवायची यात शर्यत लागली आहे. त्यामुळे दोघे बंधू एकमेकांच्या उरावर बसणार आहेत, असं भाकीत ही राऊत यांनी व्यक्त केलं. सध्या निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत तर नितेश राणे हे भाजपमध्ये असून मंत्री आहेत. भाजपाची सत्ता आहे. पण त्यांना स्वतःचे कार्यकर्ते तयार करता येत नाहीत. त्यामुळे भाडोत्री कार्यकर्ते घेऊन पक्ष वाढवावा लागत आहे. हे त्यांचं दुर्दैव आहे. आमचा पक्ष भाडोत्री लोकांचा नाही असा टोलाही राऊत यांनी यावेळी राणेंना लगावला.
सावडाव मधील बेपत्ता असलेल्या आरोपींकडे गावठी बंदूका आहेत. कदाचित ते त्याचा वापर करुन सावंत पती पत्नीची ते हत्या करू शकतात. याकडे पोलीसांनी गांभीर्याने पाहावे. सावंत कुटुंबियांचं रक्षण पोलीसांनी करावं. काही धोका झाला तर पोलीस जबाबदार असतील असंही राऊत म्हणाले. सावडाव प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असं ही ते म्हणाले. नितेश राणे यांच्या घमेंडी वक्तव्याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली आहे. येत्या दोन महिन्यात कारवाई झाली नाही तर राज्यपाल आणि नितेश राणे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत असं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world