स्वानंद पाटील, बीड
बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने आणखी एका तरुणाने आयुष्य संपवलं आहे. लातूरमधील युवकाच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच रविवारी अंबाजोगाईतील एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पांडुरंग सोनावणे असं या तरुणाचं नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ अंबा या गावात पांडुरंग रामभाऊ सोनवणे (वय 30 वर्षे) हा राहत होता. रविवारी सकाळी पांडुरंगने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.
घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीत लिहिलं होतं की, "मी पांडुरंग सोनावणे, पंकजा मुंडे माझ्या ताईसाहेब यांचा पराभव मी सहन करु शकत नाही. म्हणून मी आत्महत्या करत आहे." घटनेची माहिती मिळताच युसूफ वडगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात त्याच्या मृतदेहाच्या शविच्छेदनानंतर डिघोळ अंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
(वाचा- पंकजा मुंडेंच्या पराभवाचा धक्का, कार्यकर्त्यानं घेतला टोकाचा निर्णय)
लातूरमधील तरुणाची आत्महत्या
काही दिवसांपूर्वीच लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील येस्तार गावातील सचिन मुंडे या तरुणाने टोकाचा निर्णय घेतला होता. पंकजा मुंडे निवडून आल्या नाहीत तर मी राहत नाही, अशी फेसबुकवर पोस्ट त्याने टाकली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तो नैराश्यात होता. त्यानं शुक्रवारी (7 जून) रात्री बस खाली उडी मारुन आपलं आयुष्य संपवलं.
पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांसाठी पोस्ट
पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या समर्थकांना आवाहन केले आहे. "मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा. आई बापाला दुःख देऊ नका. त्यांच्या जीवाला घोर लावू नका. तुम्हाला शप्पथ आहे मुंडे साहेबांची", असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
( नक्की वाचा : पराभूत होऊनही मोदींनी थोपटली पंकजा मुंडेंची पाठ, दिल्लीत नेमकं काय झालं?)
"स्वतःच्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे संयम ठेवत आहे. तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने राहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी पराभव स्वीकारला आणि पचवला आहे, तुम्हीही पचवा. अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक राहा", असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.