मुकेश कुमार, भंडारा
Bhandara News : चुलत बहिणीचे लग्न आटोपून दुचाकीने कार्यालयात निघालेल्या कालवा अधीक्षक असलेल्या तरुणीचा अपघाती मृत्यू झाला आहे. ट्रकने अचानकपणे ब्रेक मारल्याने स्कूटी ट्रकवर जाऊन धडकली. परिणामी, डोक्याला गंभीर दुखापत होऊन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. शारदा दामोदर पुंढे ( वय 24 वर्ष) असे या तरुणीचे नाव असून, ती तिरोडा येथील पाटबंघारे विभागात कालवा अधीक्षक पदावर कार्यरत होती.
(नक्की वाचा- नंदुरबारमधील रस्त्यांची दुरावस्था, वऱ्हाडी मंडळींचा नवरा-नवरीला खांद्यावर बसवून प्रवास)
अधिक माहितीनुसार, मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नवेगाव धुसाळा हे शारदाचे गाव होते. नोकरीनिमित्त ती तिरोडा येथे राहत होती. आपल्या चुलत बहिणीचे लन असल्याने गेल्या तीन दिवसांपासून ती नवेगाव येथे आली होती. लग्न समारंभ आटोपल्यावर सर्वाचा निरोप घेऊन ती निघाली. मात्र, तिला मिळालेला निरोप हा अखेरचाच ठरला.
(नक्की वाचा- Pune News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; अजित पवारांचा लग्नातील फोटो व्हायरल)
नोकरीवर रुजू होण्याकरिता शारदा बुधवारी सकाळी 8.30 वाजता नवेगाववरून दुचाकीने निघाली. दरम्यान, तिरोड्याजवळील सरांडीनजीक पुढे असलेल्या 10 चाकी वाहनाच्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारले. यामुळे मागे असलेली शारदाची दुचाकी ट्रकला पाठीमागून वेगाने ट्रकला धडकली. या धडकेत शारदाच्या डोक्याला जबर मार लागला आणि खाली कोसळली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.