Maharashtra Assembly Budget Session: महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात औरंगजेबाची कबर, कुणाल कामराच्या गाण्यांवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी खळबळजनक दावा केला आहे. विधानसभेमध्ये लक्षवेधी लावण्यासाठी नेते पैसे घेतात असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले भास्कर जाधव?
"महाराष्ट्राच्या विधानसभेला गौरवशाली परंपरा आहे. याआधी गॅलरीत बसलेले पत्रकार सभागृहाचे वार्तांकन करायचे. पण आता ते बंद झाले. मात्र एका प्रसिद्ध वृत्तपत्राने विधानसभेचा खराखुरा बाजार.. असे म्हणत मोठा खुलासा केला आहे. हे सर्व काल अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांच्या एका ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षांचे लोक गेले. आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी विचारले तुम्हाला लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत ते सांगा? हे या सभागृहात घडले आहे मी सर्व पुरावे द्यायला तयार आहे.. " असा सर्वात मोठा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी केला आहे.
नक्की वाचा - Nagpur violence : नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या घरावर अखेर बुलडोझर
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्षेप घेतला. "भास्कर जाधव यांनी आधी विधासभा अध्यक्षांशी चर्चा करावी, फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. मात्र सभागृहात असे थेट आरोप करणे योग्य नाही. या सभागृहाचा सन्मान राखला गेला पाहिजे.. या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. अशाप्रकारे महाराष्ट्राच्या सभागृहाची बदनामी होता कामा नये, हे थांबले पाहिजे," असे म्हणत अजित पवार यांनी भास्कर जाधव यांच्या दाव्यावरुन संताप व्यक्त केला.