Mumbai News: मुंबईकरांच्या ताटात येणारी अंडी आता अधिक सुरक्षित आणि ताजी असण्याची शक्यता आहे. शहरात विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक अंड्यावर त्याचे उत्पादन आणि ते कधीपर्यंत खाण्यायोग्य आहे, याची तारीख (Expiry Date) छापणे बंधनकारक करावे, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत (BMC) मांडण्यात आला आहे. यामुळे खराब किंवा सडलेली अंडी विकणाऱ्यांवर आता चाप बसणार आहे.
नगरसेवक अजित रावराणे यांची ठरावाची सूचना
मालाड येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नगरसेवक अजित रावराणे यांनी हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवला आहे. सध्या बाजारात येणाऱ्या अंड्यांच्या दर्जाबाबत ग्राहकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. अनेकदा जुनी किंवा खराब अंडी विकली जातात. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी अंड्यांवर तारखेचे शिक्के मारणे आवश्यक असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.
(नक्की वाचा- ‘आता परत येणार नाही...', भरउन्हात भलीमोठी रांग, पिण्याचं पाणीही नाही, गुजरातमध्ये युपी-बिहारींचे प्रचंड हाल)
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर मागणी
काही काळापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने अशाच प्रकारे अंड्यांवर एक्सपायरी डेट टाकणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही संपूर्ण राज्यात हा नियम लागू करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने आणि येथे अंड्यांचा खप मोठा असल्याने, बीएमसीने यावर तातडीने पाऊल उचलावे, असे रावराणे यांनी सुचवले आहे.
एप्रिलमध्ये होणार चर्चा
अजित रावराणे यांची ही ठरावाची सूचना महापालिकेच्या एप्रिल महिन्याच्या कामकाजात समाविष्ट करण्यात आली आहे. या महिन्यात होणाऱ्या महासभेत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला आणि प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केली, तर मुंबईतील प्रत्येक किरकोळ आणि घाऊक विक्रेत्याला अंड्यांवर तारीख छापणे बंधनकारक होईल.
(नक्की वाचा- Ayush Mhatre: सीएसकेला मोठा 'धक्का'! इन-फॉर्म फलंदाज आयुष म्हात्रे IPLमधून बाहेर)
ग्राहकांना कसा होईल फायदा?
- अंडी ताजी आहेत की नाही हे ग्राहकांना सहज ओळखता येईल.
- जुनी अंडी ताजी सांगून विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करता येईल.
- अंड्यांच्या उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world