मनोज सातवी, प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातील तलईपाडा येथे चिमुकल्या शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची बातमी NDTV मराठीने प्रसारित केली होती. या बातमीची दखल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना रस्त्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जव्हार येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा, सहाय्यक जिल्हाधिकारी करिष्मा नायर यांनी जांभा गावातील तलईपाडा येथे भेट दिली.
त्यांच्यासोबत विक्रमगडच्या तहसीलदार आणि इतर अधिकारी यांनी जांभा गावाला भेट देऊन पाहणी केली. तसेच लवकरात लवकर प्रशासकीय औपचारिकता पूर्ण करून तलईपाडा या आदिवासी वस्तीला रस्ता उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी करिष्मा नायर यांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील जांभा ग्रामपंचायत अंतर्गत तलईपाडा येथे रस्ता नसल्यामुळे चिमुकल्या शाळकरी मुलांसह नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील शाळकरी मुलांना रस्ता किंवा पूल नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन धोकादायक नाले पार करावे लागत आहेत. यावेळी दुर्घटना देखील होऊ शकते. तर जास्त पाऊस पडल्यास ओढ्याचे पाणी वाढत असल्यामुळे मुलांना शाळेला दांडी मारावी लागते.
( नक्की वाचा : Good News : राज्यात 81 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, 20 हजार जणांना मिळणार रोजगार )
या आदिवासी पाड्यातील शाळकरी मुलांना दीड किलोमीटर असलेल्या जांभा गावातील प्राथमिक शाळेत जावं लागतं. तर साखरे येथे माध्यमिक शाळेत जाण्यासाठी अडीच ते तीन किलोमीटर अंतर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे तलईपाडा या आदिवासी पाड्यावर लवकरात लवकर रस्त्याची सुविधा करून देण्याची मागणी नागरिकांनी कडून होत आहे. NDTV मराठीनं ही बातमी दाखवताच थेट मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे.