Nashik News : नाशिकमधील अत्याचारी भोंदूबाबा अशोक खरात यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. खरात याचे अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत फोटो समोर आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि खरात याच्या कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत, महत्त्वाचं म्हणजे चाकरणकरांनी खरात याला गुरु मानल्याचंही समोर आलं. खरात प्रकरणात चाकणकरांवर अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले.
चाकणकरांवर सर्वात मोठा आरोप...
आता भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर सर्वात मोठी आरोप करण्यात आला आहे. रुपाली ठोंबरे यांनी हा आरोप केला आहे. रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. अशोक खरातने जे काही केलं ते चाकणकरांच्या पाठिंब्यामुळे केलं. त्यामुळे अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना मुख्य आरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे, तसं पत्रही रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे.
रुपाली ठोंबरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
रुपाली चाकणकरांना राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटमध्ये सूत्रधार म्हणून आरोपी करा अशा आशयाचं पत्र रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. गेल्यावर्षी पत्रकाराने खरातचा पर्दाफाश करुन त्याच्या गैरकृत्याची बातमी दिली होती. तेव्हा पत्रकाराला फोन करुन त्याच्याविरुद्ध कारवाईची धमकी देत माफीनामा घेतला गेला. हा भोंदूबाबा पूर्वीपासून बलात्कार करत होता हे रुपाली चाकणकरांना माहीत होतं. रुपाली चाकणकरांना ताब्यात घेऊन तपास सुरू करणं आवश्यक आहे. खरातने केलेल्या लैंगिक शोषणाचा व्हिडिओ व्हायरल होऊ नये वावी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोंदूबाबाला वाचविण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत खरातने केलेल्या कृत्यांवर पाणी टाकलं आहे. भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे हे यावरून स्पष्ट दिसतं. तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने लाडक्या भावास नम्र विनंती की चाकणकरांना अटक करुन पीडित महिलांना न्याय द्या.