प्रियांका गांधींच्या रॅलीत तुफान राडा! काँग्रेस- भाजप कार्यकर्ते भिडले; राजकारण का तापलं?

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रोड- शो दरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले ज्यानंतर हा सगळा राजकीय राडा झाला

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी, नागपूर:  नागपूरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रोड- शो दरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले ज्यानंतर हा सगळा राजकीय राडा झाला. या प्रकारानंतर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम  टप्प्यात आला असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात सभा घेत आहेत. आज (रविवार, ता. 17) प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोडशो आयोजित करण्यात आला होता. या रोड शो दरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. 

नक्की वाचा: 'दोन वर्षांपूर्वी तुमचा भुसा पाडला', एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

पश्चिम नागपूर येथील रोड शो आटोपून प्रियांका गांधी मध्य नागपुरात रोड शोसाठी पोहचल्या असताना भाजप कार्यकर्त्यांनी रोड शो थांबविण्याचा प्रयत्न केला. मध्य नागपुर मतदार संघाच्या बड़कस चौकात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या रॅलीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मध्य नागपूर येथील भाजप उमेदवार प्रवीण दटके यांचे कार्यकर्ते भाजपचे झेंडे घेऊन रॅलीमध्ये घुसले, ज्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडाही झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरएसएस कार्यालयासमोर घोषणाबाजी केल्याने हा राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला. शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या रॅलीमध्ये अशाप्रकारे दहशत माजवणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही सांगितले आहे. 

Advertisement

महत्वाची बातमी: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 2 मंत्री आणि 3 आमदारांच्या घरावर हल्ला