मंगेश जोशी, जळगाव
Jalgaon Election News: निवडणूक कोणतीही असो, निकालाची उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली असते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या निकालाचा सस्पेन्स अधिकृतपणे संपण्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांनी निकालाची 'घोषणा' करून टाकली आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे मोठमोठे बॅनर्स शहरात झळकले असून, यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
हाय-प्रोफाइल लढतीने वेधले लक्ष
चाळीसगाव नगरपालिकेची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीत दोन बलाढ्य राजकीय घराणी आमनेसामने आहेत. प्रतिभा चव्हाण या विद्यमान भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या विजयासाठी आमदारांनी मोठी ताकद पणाला लावली आहे. तर पद्मजा देशमुख या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार राजीव देशमुख यांच्या पत्नी आहेत. देशमुख कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.
निकालापूर्वीच शुभेच्छांचा पाऊस
मतमोजणी पूर्ण होऊन अधिकृत निकाल हाती येण्यास अजून अवधी असतानाच, चाळीसगावच्या मुख्य चौकात आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर प्रतिभा चव्हाण यांचे अभिनंदन करणारे बॅनर्स लावले गेले आहेत. "चाळीसगावच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा" असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांचा हा अतिउत्साह आहे की भाजपला मिळालेली खात्रीशीर गुप्त माहिती, याबाबत आता शहरात चर्चा रंगली आहे.
(नक्की वाचा- Beed Election Result 2025: निकालाआधी बीडमध्ये मोठी घडामोड! विद्यमान आमदाराचा भाऊ हद्दपार)
आत्मविश्वास की अतिउत्साह?
राजकारणात निकालापूर्वी बॅनर्स लावणे ही नवी गोष्ट नाही, मात्र चाळीसगावसारख्या चुरशीच्या लढतीत असा प्रकार घडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. "लोकशाहीत मतमोजणी महत्त्वाची असते, बॅनर्स लावून विजय मिळत नाही," अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटत आहे. दुसरीकडे, भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दांडगा असून त्यांनी आतापासूनच विजयाचा गुलाल उधळण्याची तयारी केली आहे.
मतदारांचा कौल कोणाकडे?
चाळीसगाव नगरपालिकेत गेल्या काही वर्षांत विकासाचे अनेक मुद्दे गाजले आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात केलेली कामे आणि दिवंगत राजीव देशमुख यांच्याबद्दल असलेली सहानुभूती या दोन प्रमुख मुद्द्यांवर ही निवडणूक फिरत आहे. आता हे बॅनर्स खरे ठरणार की निकालात काही वेगळा उलटफेर होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world