Dombivli News : मुंबईतील अनेक ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या टोरेस कंपनीमुळे हजारो नागरिकांचं मोठं नुकसान झालं. गुंतवणुकदारांचं लाखो-कोटींमध्ये नुकसान झालं. हे प्रकरण ताजं असताना डोंबिवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतील एका सुशिक्षित वस्तीत अशीच एक बोगस बँक सुरू असल्याचं समोर आलं आहे. या बँकेची राज्य सरकार किंवा केंद्राकडे कोणतीही नोंदणी नाही. धक्कादायक म्हणजे या बँकेत ग्राहकांना 12.5 टक्के व्याजाचं आमिष देत ठेवी गोळा करण्याच्या तयारी असलेल्या या कथित सहकारी बँकेवर नियंत्रण आणण्यात यश आलं आहे. याबाबत माहिती मिळताच राज्य सहकारी बँकेने तातडीने पाऊल उचलत हा गैरप्रकार होण्यापासून टाळला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोंबिवलीतील मानपाडा मार्गावर 'फिनशार्प सहकारी बँक' या नावाने आलिशान कार्यालय थाटण्यात आलं आहे. कमी कागदपत्रं, किमान व्याजदरात कर्ज, पादर्शक व्यवहार आणि पुढील दोन वर्षे ठेवींवर 12.5 टक्के व्याज अशी आकर्षक जाहिरात करण्यात आली. याची माहिती मिळताच राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार करून बनावट असल्याचा संशय व्यक्त केला. ही बँक सहकारी असल्याचं सांगत असली तरी प्रत्यक्षात तिची नोंदणी सहकार आयुक्तांकडे दिसून आलेली नाही. येथे संचालक मंडळ नाही तर केवळ चार संचालक आहेत. 2002 नंतर रिझर्व्ह बँकेने देशात कोणत्याही सहकारी बँकेला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे अनास्कर यांनी चौकशीची मागणी केली होती.
नक्की वाचा - Raigad Crime: अरेच्चा! पोलिसच निघाले दरोडेखोर, 1 कोटी 50 लाख लांबवले, पण पुढे...
धक्कादायक बाब म्हणजे बँकेने शहरात दोन ठिकाणी कार्यालये थाटली होती. याची मोठी जाहिरात करण्यात आली होती. अनिल सिन्हा, सतीश पाटील, मनीष सवाणे आणि किरण पाटील हे बँकेचे संस्थापक संचालक असून बँकेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा इतर ठिकाणी नोंदणी झाली नसल्याचं प्राथमिक चौकशीत दिसून आलं आहे. नोंदणी नसताना बँक चालविणे कायद्याने गुन्हा असल्याने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान अद्याप आपण बँकिंग व्यवहार सुरू केले नसल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world