महानगरी एक्सप्रेसच्या शौचालयात धक्कादायक संदेश, रेल्वे थांबवली; पोलीस अलर्टवर, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

Bhusaval Railway Station bomb threat : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या संशयास्पद संदेशामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, प्रतिनिधी 

Bomb threat message on Mahanagari Express : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या संशयास्पद संदेशामुळे मोठी खळबळ उडाली आहे. महानगरी एक्सप्रेसच्या एका कोचमधील शौचालयात देशविरोधी घोषणेसह बॉम्ब असल्याच्या संदेश आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. याबाबत माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल लोहमार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाचोरा जळगाव भुसावळ रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे सुरक्षा बल-लोहमार्ग पोलिसांनी महानगरी एक्सप्रेसची तपासणी केली.

भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी लोहमार्ग पोलीस विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस अधिकारी यांच्यासह श्वानपथकाद्वारे संपूर्ण गाडीची तपासणी करण्यात आली तसेच संशयास्पद संदेश देखील पुसण्यात आला. त्यानंतर महानगरी एक्सप्रेस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली. 

नक्की वाचा - Delhi Car Blast: वाहनांच्या गर्दीत अचानक स्फोट अन् आगीचा भडका; नेमकं काय घडलं, पाहा VIDEO

संशयास्पद संदेशात देश विरोधी संघटनेचा उल्लेख 

रेल्वे सुरक्षा बलाकडून मिळालेल्या माहितीनुसार महानगरी एक्सप्रेसच्या एका कोचमधील शौचालयात अज्ञात व्यक्तीने गाडीत बॉम्ब असल्याचा धमकी वजा संदेश लिहिला होता. या संदेशात देश विरोधी घोषणेसह देशविरोधी संघटनेचाही उल्लेख केला होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन महानगरी एक्सप्रेसमधील प्रवाशांची आणि त्यांच्या साहित्यांची संपूर्ण कसून तपासणी केली. मात्र या तपासणी दरम्यान कुठलीही आक्षेपार्ह व्यक्ती किंवा वस्तू आढळून आली नसल्याने हा केवळ खोडसाळपणा केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट असल्याने रेल्वे विभागाची सुरक्षा यंत्रण आणि स्थानिक पोलीस अलर्ट असून त्यामुळे महानगरी एक्सप्रेसमधील या संशयास्पद संदेशाची सुरक्षा यंत्रणांनी गंभीर दखल घेतली आहे. संशयास्पद संदेश हा खोडसाळपणा की कट ? याचा देखील सुरक्षा यंत्रणांकडून तपास केला जात आहे. 

Advertisement

सदर संशयास्पद संदेशामुळे मात्र महानगरी एक्सप्रेसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रवाशांनी व नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून या प्रकाराचा संपूर्ण तपास होईपर्यंत रेल्वे सुरक्षा यंत्रणा अलर्ट राहणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी.आर.मीना यांनी एनडीटीव्ही  मराठीला दिली आहे.